
मुंबई, 17 ऑगस्ट (हिं.स.)। मॉपशॉप डिस्ट्रीब्युशन लिमिटेडचा प्रारंभिक सार्वजनिक प्रस्ताव अर्थात आयपीओ येत्या १९ ऑगस्ट २०२६ रोजी सदस्यतेसाठी खुला होणार असून, २१ ऑगस्ट रोजी बंद होणार आहे. कंपनीने आयपीओसाठी प्रति इक्विटी शेअर १३८ रुपये किंमत निश्चित केली असून, इश्यूचा एकूण आकार २७.२६ कोटी रुपये आहे. कंपनीचे समभाग बीएसई एसएमई प्लॅटफॉर्मवर सूचीबद्ध करण्याचा प्रस्ताव आहे.
या आयपीओमध्ये १५ लाख १ हजार इक्विटी शेअर्सचा ताजा इश्यू आणि ३ लाख ७५ हजार इक्विटी शेअर्सचा विक्रीसाठी प्रस्ताव समाविष्ट आहे. प्रत्येक शेअरचे दर्शनी मूल्य १० रुपये आहे. गुंतवणूकदारांसाठी लॉट आकार १ हजार इक्विटी शेअर्स निश्चित करण्यात आला आहे. त्यामुळे आयपीओमध्ये अर्ज करण्यासाठी गुंतवणूकदारांना किमान १ हजार शेअर्ससाठी अर्ज करावा लागेल. १३८ रुपये प्रति शेअर या किंमतीनुसार किमान गुंतवणूक १ लाख ३८ हजार रुपये इतकी असेल.
इश्यूमध्ये ९९ हजार इक्विटी शेअर्स बाजार निर्मात्यासाठी राखीव ठेवण्यात आले आहेत, तर सार्वजनिक गुंतवणूकदारांसाठी निव्वळ इश्यू १८ लाख ७६ हजार इक्विटी शेअर्सचा आहे. खांडवाला सिक्युरिटीज लिमिटेड या इश्यूची बुक रनिंग लीड मॅनेजर असून, कॅमिओ कॉर्पोरेट सर्व्हिसेस लिमिटेड रजिस्ट्रार म्हणून काम पाहणार आहे.
आयपीओतून मिळणाऱ्या निव्वळ निधीपैकी ११.९८ कोटी रुपये कंपनीचे काही प्रलंबित कर्ज फेडण्यासाठी वापरण्यात येणार आहेत. तसेच वाहतूक आणि लॉजिस्टिक्ससाठी व्यावसायिक वाहने खरेदी करण्यासाठी २.६० कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. वसई, पालघर, ठाणे येथील गोदाम सुविधेवर रूफटॉप ग्रीड सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी १.०५ कोटी रुपये भांडवली खर्चासाठी राखीव ठेवण्यात आले आहेत. उर्वरित निधी सामान्य कॉर्पोरेट उद्देशांसाठी आणि इश्यूशी संबंधित खर्चासाठी वापरला जाणार आहे.
कंपनीच्या आर्थिक कामगिरीतही सुधारणा दिसून आली आहे. आर्थिक वर्ष २०२६ मध्ये मॉपशॉप डिस्ट्रीब्युशनचे संचालनातून उत्पन्न ४४.६० कोटी रुपये होते, जे आर्थिक वर्ष २०२५ मधील ४१.९९ कोटी रुपयांच्या तुलनेत ६.२२ टक्क्यांनी वाढले. करानंतरचा नफा ५.१८ कोटी रुपयांवर पोहोचला असून, मागील वर्षातील ३.४८ कोटी रुपयांच्या तुलनेत त्यात ४८.८८ टक्क्यांची वाढ झाली. करपूर्व नफाही ४.६८ कोटी रुपयांवरून वाढून ६.९१ कोटी रुपये झाला आहे.
२०१८ मध्ये स्थापन झालेली मॉपशॉप डिस्ट्रीब्युशन कंपनी फॅसिलिटी मॅनेजमेंट पुरवठा क्षेत्रात कार्यरत आहे. मायक्रोफायबर कपडे, पृष्ठभाग निर्जंतुकीकरण उत्पादने, सेन्सर आधारित डिस्पेंसर, जैवविघटनशील कचरा पिशव्या, टिश्यू पेपर, पेडल बिन, रिंजर बकेट, व्हॅक्यूम क्लीनर, एअर फ्रेशनर आणि टूल किट्स यांसारखी उत्पादने कंपनी पुरवते. बँकिंग, वित्तीय सेवा व विमा, बांधकाम, रिअल इस्टेट, आरोग्यसेवा आणि फॅसिलिटी मॅनेजमेंट क्षेत्रातील ३०० हून अधिक ग्राहकांना कंपनी सेवा देत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule