भू-राजकीय तणावामुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स २८१ अंकांनी कोसळला
नवी दिल्ली, 17 ऑगस्ट (हिं.स.)। अमेरिकन-इराण संघर्षाबाबत वाढलेली अनिश्चितता आणि कच्च्या तेलाच्या वाढलेल्या किमतींचा दबाव सोमवारी भारतीय शेअर बाजारावर स्पष्टपणे दिसून आला. निफ्टी ५० निर्देशांक ७८.३५ अंकांनी म्हणजेच ०.३२ टक्क्यांनी घसरून २४,२८७.६५ अंक
Stock Market Closing


नवी दिल्ली, 17 ऑगस्ट (हिं.स.)। अमेरिकन-इराण संघर्षाबाबत वाढलेली अनिश्चितता आणि कच्च्या तेलाच्या वाढलेल्या किमतींचा दबाव सोमवारी भारतीय शेअर बाजारावर स्पष्टपणे दिसून आला. निफ्टी ५० निर्देशांक ७८.३५ अंकांनी म्हणजेच ०.३२ टक्क्यांनी घसरून २४,२८७.६५ अंकांवर बंद झाला. तर सेन्सेक्स २८१.०९ अंकांनी म्हणजेच ०.३६ टक्क्यांनी घसरून ७७,७२८.१६ अंकांवर स्थिरावला. मात्र बँक निफ्टीमध्ये ०.०१ टक्क्यांची किरकोळ वाढ झाली.

निफ्टी ५० ची सुरुवात २४,३४३.४५ अंकांवर झाली. सुरुवातीच्या व्यवहारात निर्देशांकाने २४,३६०.१० अंकांचा उच्चांक गाठला. मात्र विक्रीचा दबाव वाढल्यानंतर तो सकाळच्या सत्रात २४,२२६.९५ अंकांपर्यंत घसरला. त्यानंतर दुसऱ्या सत्रात बाजाराने काही प्रमाणात पुनरागमन केले आणि निफ्टी २४,३०० अंकांच्या वर पोहोचला. मात्र व्यवहाराच्या अखेरीस काही नफा कमी झाल्याने निर्देशांक लाल रंगात बंद झाला.

इंडिया व्हीआयएक्समध्ये सुमारे एक टक्क्यांची वाढ झाली, मात्र तो ११.५ अंकांच्या खाली राहिला. त्यामुळे बाजारात सावध वातावरण असले तरी अस्थिरता अद्याप नियंत्रणात असल्याचे दिसून आले. अमेरिकन-इराण चर्चेत निर्माण झालेल्या अडथळ्यांमुळे भू-राजकीय तणाव कमी होण्याबाबत गुंतवणूकदारांमध्ये संभ्रम कायम आहे. कच्च्या तेलाच्या दरातही चढ-उतार दिसून आला. ब्रेंट क्रूडचा दर सुरुवातीला सुमारे ८९.३० अमेरिकी डॉलर प्रति बॅरलपर्यंत वाढला आणि नंतर ८८.७० डॉलरच्या आसपास आला. लेबनॉनमधील पुन्हा सुरू झालेली लढाई तसेच होर्मुझच्या सामुद्रधुनीतील जहाजांवरील हल्ल्यांमुळे जागतिक तेलपुरवठ्याबाबत चिंता वाढली आहे.

क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये रिअल्टी क्षेत्राने १.४६ टक्क्यांची वाढ नोंदवत सर्वोत्तम कामगिरी केली. ओबेरॉय रिअल्टीच्या समभागात ४.५ टक्क्यांहून अधिक वाढ झाली. याउलट निफ्टी आयटी निर्देशांक १.७५ टक्क्यांनी घसरला आणि त्यातील सर्व समभाग घसरणीसह बंद झाले. समभागांच्या कामगिरीत ऑर्किड फार्माला ४.५२ टक्क्यांची घसरण सहन करावी लागली, तर अहलुवालिया कॉन्ट्रॅक्ट्सचा समभाग ५.१९ टक्क्यांनी घसरला. दुसरीकडे हिंदुस्तान एरोनॉटिक्समध्ये ०.५८ टक्क्यांची वाढ झाली. रिलायन्स इंडस्ट्रीज, लार्सन अँड टुब्रो आणि एचडीएफसी बँकेने निफ्टीला काहीसा आधार दिला, तर इन्फोसिस, भारती एअरटेल आणि सन फार्माने निर्देशांकावर दबाव आणला.

१७ ऑगस्ट रोजी बाजाराची रुंदी कमकुवत राहिली. एनएसईवर व्यापार झालेल्या ३,६२३ समभागांपैकी १,६८३ वाढले, १,८२५ घसरले आणि ११५ अपरिवर्तित राहिले. एकूण १२७ समभागांनी त्यांचे ५२ आठवड्यांचे उच्चांक गाठले, तर ९६ समभागांनी त्यांचे ५२ आठवड्यांचे नीचांक गाठले. दरम्यान, १२२ समभागांना अपर सर्किट लागले आणि १४२ समभागांनी लोअर सर्किट गाठले. प्रमुख समभागांमध्ये हिंदाल्को, टाटा स्टील, एचडीएफसी लाईफ, ओएनजीसी, ॲक्सिस बँक आणि एल अँड टी यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली. तर दुसरीकडे एचसीएल टेक, इन्फोसिस, सन फार्मा, टीसीएस आणि नेस्ले इंडिया यांचे शेअर्स तोट्यात बंद झाले.

एकूणच, भारतीय शेअर बाजार सलग पाचव्या सत्रात दबावाखाली राहिला. निवडक रिअल्टी समभागांनी चांगली कामगिरी केली असली तरी आयटी क्षेत्रातील कमजोरी, भू-राजकीय अनिश्चितता आणि कच्च्या तेलाच्या दरातील चढ-उतार यामुळे गुंतवणूकदारांचा सावध पवित्रा कायम राहिला.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande