जुन्या वाहनांसाठी ई-10 पेट्रोलचा पर्याय द्यावा- व्ही. अनंत नागेश्वरन
मुख्य आर्थिक सल्लागारांचा सरकारला महत्त्वपूर्ण सल्ला नवी दिल्ली, 17 ऑगस्ट (हिं.स.) : देशात ई-20 पेट्रोलच्या वापरावरून सुरू असलेल्या चर्चेदरम्यान भारत सरकारचे मुख्य आर्थिक सल्लागार व्ही. अनंत नागेश्वरन यांनी जुन्या वाहनांसाठी ई-10 पेट्रोलचा पर्याय
व्ही. अनंत नागेश्वरन , भारत सरकारचे मुख्य आर्थिक सल्लागार


मुख्य आर्थिक सल्लागारांचा सरकारला महत्त्वपूर्ण सल्ला

नवी दिल्ली, 17 ऑगस्ट (हिं.स.) : देशात ई-20 पेट्रोलच्या वापरावरून सुरू असलेल्या चर्चेदरम्यान भारत सरकारचे मुख्य आर्थिक सल्लागार व्ही. अनंत नागेश्वरन यांनी जुन्या वाहनांसाठी ई-10 पेट्रोलचा पर्याय उपलब्ध करून देण्याची गरज व्यक्त केली आहे. देशातील सुमारे 7.5 ते 8 कोटी जुनी दुचाकी वाहने अद्याप कार्ब्युरेटर प्रणालीवर चालतात. या वाहनांवर ई-20 इंधनाचा परिणाम होऊ शकतो, असे त्यांनी नमूद केले आहे.

ई-20 पेट्रोलच्या वापरामुळे वाहनांचे मायलेज कमी होते, वाहनांच्या घटकांची झीज वाढते आणि इंजिनच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो, अशा चर्चा सध्या देशभरात सुरू आहेत. रस्त्यांपासून संसद आणि सोशल मीडियापर्यंत या विषयावर मोठ्या प्रमाणावर चर्चा होत आहे. अनेक वाहनचालक ई-5 किंवा ई-10 सारख्या कमी इथेनॉल मिश्रित पेट्रोलचा पर्याय उपलब्ध करून देण्याची मागणी करत आहेत.दरम्यान, सरकारमधील वरिष्ठ पातळीवरील व्यक्तीकडून प्रथमच ई-10 पेट्रोल पुन्हा उपलब्ध करून देण्याची भूमिका मांडण्यात आली आहे. नागेश्वरन यांनी इंडियन एक्स्प्रेसमध्ये प्रसिद्ध झालेल्या लेखात ई-20 नंतर ई-27 किंवा ई-30 सारख्या उच्च इथेनॉल मिश्रणाकडे जाण्यापूर्वी ‘फूड विरुद्ध फ्युएल ट्रेड-ऑफ’ म्हणजेच अन्न आणि इंधन यांच्यातील संभाव्य संघर्षाचा सखोल विचार करण्याची गरज व्यक्त केली आहे.

मका पेट्रोलची टाकी भरणार की लोकांचे पोट?

इथेनॉल मिश्रित पेट्रोलचा वापर वाढवण्यामागे तेल आयात कमी करणे, परकीय चलनाची बचत आणि पर्यावरणीय फायदे अशी अनेक कारणे दिली जातात. मात्र, भविष्यात ई-27 किंवा ई-30 सारख्या उच्च मिश्रणाकडे जाण्यापूर्वी त्यासाठी लागणाऱ्या कृषी उत्पादनांचा, पाण्याचा आणि जमिनीच्या वापराचा परिणाम तपासणे आवश्यक असल्याचे नागेश्वरन यांनी म्हटले आहे.विशेषतः मका आणि इतर पिकांचा वापर इथेनॉल निर्मितीसाठी वाढल्यास त्याचा अन्नधान्याच्या उपलब्धतेवर परिणाम होऊ शकतो का, हा प्रश्न महत्त्वाचा असल्याचे त्यांनी अधोरेखित केले आहे.

ई-20 मुळे मायलेज किती कमी होऊ शकते ?

नागेश्वरन यांच्या मते, इथेनॉलमध्ये पेट्रोलच्या तुलनेत कमी ऊर्जा असते. एक लिटर इथेनॉलमधून मिळणारी ऊर्जा पेट्रोलच्या तुलनेत सुमारे दोन-तृतीयांश असते. त्यामुळे ई-20 वापरणाऱ्या वाहनाला एका लिटर इंधनातून काही प्रमाणात कमी अंतर कापता येऊ शकते.मात्र, याचा अर्थ वाहनाचे इंजिन खराब झाले असा होत नाही. ई-20 मध्ये इथेनॉलचे प्रमाण 20 टक्के असल्याने एकूण ऊर्जा उपलब्धतेत साधारण 6 ते 7 टक्क्यांची घट होऊ शकते. सोशल मीडियावर काही ठिकाणी सांगितले जाणारे 30 टक्क्यांपर्यंत मायलेज कमी होण्याचे दावे मात्र योग्य नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

ई-20 मुळे प्रदूषणात घट होण्याची शक्यता

ई-20च्या वापरामुळे कार्बन मोनोऑक्साइड आणि न जळलेले हायड्रोकार्बन यांसारख्या प्रदूषकांचे उत्सर्जन कमी होऊ शकते. तसेच इंजिनची आयुष्यकालीन कार्यक्षमता आणि टिकाऊपणाबाबत आतापर्यंत झालेल्या चाचण्यांमध्ये चिंताजनक बाब समोर आलेली नाही.अमेरिकेतील ओक रिज नॅशनल लॅबोरेटरीने ई-20साठी अनुकूल नसलेल्या 86 वाहनांवर ई-20 मिश्रित इंधनाची चाचणी घेतली. या वाहनांनी सुमारे 1 कोटी किलोमीटर अंतर पार केले. या चाचण्यांमध्ये वाहनांच्या घटकांमध्ये अतिरिक्त झीज आढळली नसल्याचे नागेश्वरन यांनी नमूद केले आहे.भारतामध्येही एआरएआय पेट्रोलियम इन्स्टिट्यूट आणि इंडियन ऑइल यांच्या चाचण्यांमधून साधारणपणे याच दिशेने निष्कर्ष समोर आले आहेत. त्यामुळे प्रत्येक ई-20-सक्षम नसलेल्या वाहनाचे इंजिन खराब होते, असा दावा आकडेवारीच्या आधारे सिद्ध होत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

जुन्या कार्ब्युरेटर असलेल्या दुचाकींसमोर मात्र वेगळी समस्या

यामध्ये भारतातील सुमारे 7.5 ते 8 कोटी जुन्या दुचाकी वाहनांचा अपवाद महत्त्वाचा आहे. ही वाहने बीएस-4 मानकापूर्वीची असून त्यापैकी अनेक वाहनांमध्ये कार्ब्युरेटरचा वापर केला जातो.जुने कार्ब्युरेटर इथेनॉल मिश्रित इंधनातील अतिरिक्त ऑक्सिजनच्या प्रमाणानुसार इंधनाचा पुरवठा आपोआप समायोजित करू शकत नाहीत. त्यामुळे इंजिनला आवश्यकतेपेक्षा कमी इंधन मिळण्याची शक्यता असते. परिणामी इंजिन अधिक गरम होऊ शकते.याशिवाय, जुन्या वाहनांमधील रबर सील हीदेखील चिंतेची बाब आहे. ही सील इथेनॉलसाठी अनुकूल नसल्यास दीर्घकाळ इथेनॉलच्या संपर्कामुळे त्यांची झीज होऊ शकते. मात्र, या सीलच्या जागी इथेनॉल-अनुकूल सील बसवणे फार खर्चिक नसल्याचेही नमूद करण्यात आले आहे.

जुन्या वाहनांसाठी ई-10 उपलब्ध करण्याची मागणी

देशातील कोट्यवधी जुन्या दुचाकी वाहनांना एक-एक करून अपग्रेड करणे मात्र सोपे नाही. ही प्रक्रिया सुरू केली तरी संपूर्ण वाहन ताफ्याचे रूपांतर होण्यासाठी अनेक वर्षे लागू शकतात.नागेश्वरन यांच्या मते, मूळ धोरणात या समस्येचा विचार करण्यात आला होता आणि जुन्या वाहनांसाठी कमी इथेनॉल मिश्रित पेट्रोल उपलब्ध करून देण्याची तरतूद होती. मात्र, कालांतराने कमी इथेनॉल मिश्रित पेट्रोल पेट्रोल पंपांवरून मोठ्या प्रमाणात उपलब्ध राहिलेले नाही.त्यामुळे ई-20 सोबत ई-10 पेट्रोलचाही पर्याय उपलब्ध करून देणे आवश्यक आहे, असे नागेश्वरन यांनी सुचवले आहे. ई-10मध्ये 90 टक्के पेट्रोल आणि 10 टक्के इथेनॉल असते.

यामुळे जुन्या वाहनांच्या मालकांना दिलासा मिळू शकतो आणि ई-20 पेट्रोलबाबत निर्माण झालेली भीतीही कमी होण्यास मदत होऊ शकते. विशेष म्हणजे, यासाठी देशातील एकूण इथेनॉल वापर वाढवण्याची गरज नाही. जुन्या वाहनांसाठी ई-10सारखे कमी मिश्रणाचे इंधन उपलब्ध ठेवता येईल आणि नवीन वाहनांमध्ये ई-20चा वापर सुरू ठेवता येईल.थोडक्यात, ई-20चा वापर सुरू ठेवताना जुन्या वाहनांसाठी ई-10चा पर्याय उपलब्ध करून देणे हा तांत्रिक, आर्थिक आणि व्यावहारिकदृष्ट्या अधिक संतुलित मार्ग ठरू शकतो.

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी


 rajesh pande