
अवघ्या 24 तासांत बनले 1.7 लाखांहून अधिक फॉलोअर्स
नवी दिल्ली, 17 ऑगस्ट (हिं.स.) : सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर ‘कॉकरोच जनता पार्टी’ (सीजेपी) नंतर आता ‘दिमागी नक्षल पार्टी’ (डीएनपी) या नावाने तयार करण्यात आलेले एक नवे अकाउंट चर्चेत आले आहे. या अकाउंटने अवघ्या 24 तासांत 1.7 लाखांहून अधिक फॉलोअर्स मिळवल्याचे समोर आले आहे.
इन्स्टाग्रामवरील उपलब्ध माहितीनुसार, हे अकाउंट याच महिन्यात तयार करण्यात आले आहे. उपलब्ध लॉगनुसार, या अकाउंटचे यूजरनेम एकदा बदलण्यात आले आहे. आतापर्यंत या अकाउंटवर 63 पोस्ट करण्यात आल्या असून, हे अकाउंट सुमारे 35 जणांना फॉलो करते. मात्र, हे अकाउंट नेमके कोण चालवत आहे, याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.दरम्यान, हा प्रकार अशा वेळी समोर आला आहे, जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात सशस्त्र नक्षलवाद्यांविरोधातील कारवाईचा उल्लेख करताना देशाला ‘बुद्धिजीवी किंवा दिमागी नक्षलवाद्यां’पासून सावध राहण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर ‘दिमागी नक्षल पार्टी’ हा शब्द चर्चेत आला आहे. या नावाने इन्स्टाग्रामवर अनेक अकाउंट्सही दिसून येत आहेत.
स्वातंत्र्यदिनानिमित्त लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून देशाला संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले होते की, जंगलात शस्त्रे घेऊन हिंसाचार करणारे नक्षलवादी संपले असले तरी ‘दिमागी नक्षल’ अजूनही संधीच्या शोधात आहेत. ते हिंसाचाराचे नवे मार्ग शोधत असून देशाला चुकीच्या दिशेने नेण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा लोकांची ओळख पटवून त्यांना समाजापासून वेगळे केले पाहिजे, असेही त्यांनी म्हटले होते.
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी आपल्या पोस्टद्वारे ‘दिमागी नक्षल’ या शब्दाचा वापर कोणासाठी करण्यात आला आहे, याबाबत स्पष्टीकरण दिले. त्यांच्या म्हणण्यानुसार, हा शब्द विशेषतः माओवाद्यांना पाठिंबा देणाऱ्या आणि भारतीय संविधानाला न मानणाऱ्या व्यक्तींसाठी वापरण्यात आला आहे.तसेच, फुटीरतावाद्यांच्या बाजूने उभे राहणे, जम्मू-काश्मीरमध्ये कलम 370 चे समर्थन करणे आणि भारताच्या ईशान्य भागाला देशाच्या उर्वरित भागापासून वेगळे करण्यासाठी ‘चिकन्स नेक’ तोडण्याचा कट रचणे, अशा विचारसरणीच्या लोकांसाठीही हा शब्द वापरण्यात आल्याचे रिजिजू यांनी म्हटले आहे.-------------------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी