‘आजच्या गरजांपेक्षा पुढील ५० वर्षांचा विचार करा’ - नितीन गडकरी
पुणे, 17 ऑगस्ट (हिं.स.)। देशाच्या आर्थिक विकासाचा पाया मजबूत करण्यासाठी पायाभूत सुविधांचा विकास अत्यंत महत्त्वाचा आहे. रस्ते, महामार्ग, पूल, बोगदे, जलमार्ग आणि दळणवळणाच्या सुविधांचे नियोजन करताना केवळ आजच्या गरजांचा विचार न करता पुढील २५ ते ५० वर्
grdf


पुणे, 17 ऑगस्ट (हिं.स.)।

देशाच्या आर्थिक विकासाचा पाया मजबूत करण्यासाठी पायाभूत सुविधांचा विकास अत्यंत महत्त्वाचा आहे. रस्ते, महामार्ग, पूल, बोगदे, जलमार्ग आणि दळणवळणाच्या सुविधांचे नियोजन करताना केवळ आजच्या गरजांचा विचार न करता पुढील २५ ते ५० वर्षांचा दृष्टिकोन ठेवणे आवश्यक आहे, असे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले.

सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठातर्फे आयोजित ‘फेस्टिव्हल ऑफ थिंकर्स’ कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी सिंबायोसिसच्या प्रधान संचालिका व सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाच्या कुलपती डॉ. विद्या येरवडेकर, कुलगुरू डॉ. रामकृष्णन रमण, वैद्यकीय व आरोग्य विज्ञान विद्याशाखेचे प्रोव्होस्ट डॉ. राजीव येरवडेकर, कुलसचिव डॉ. शेजूळ आदी उपस्थित होते.

गडकरी यांनी पायाभूत सुविधा, तंत्रज्ञान, संशोधन, रोजगारनिर्मिती आणि आर्थिक विकास यांचा परस्परसंबंध स्पष्ट केला. ‘नॉलेज टू वेल्थ’ हा भविष्यातील विकासाचा मार्ग असून ज्ञानाचे संपत्तीत रूपांतर करण्यासाठी तंत्रज्ञान, संशोधन, नवकल्पना, उद्योजकता आणि कौशल्य विकासाला चालना देणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेच्या निर्मितीचा अनुभव सांगताना गडकरी म्हणाले की, भविष्यातील वाहतूक लक्षात घेऊन रस्त्यांची क्षमता निश्चित केली पाहिजे. आजच्या समस्यांवर केवळ तात्पुरते उपाय करण्याऐवजी दीर्घकालीन आणि भविष्यवेधी नियोजन आवश्यक आहे.

पायाभूत सुविधांच्या विकासामुळे उद्योग, व्यापार, पर्यटन आणि रोजगाराला मोठी चालना मिळते. वाहतूक खर्च कमी झाल्यास भारतीय उद्योग जागतिक बाजारपेठेत अधिक स्पर्धात्मक होतील. चांगल्या रस्त्यांमुळे शेतकऱ्यांना बाजारपेठ उपलब्ध होते, ग्रामीण भाग मुख्य प्रवाहाशी जोडला जातो आणि नवीन उद्योग व रोजगाराच्या संधी निर्माण होतात, असेही त्यांनी नमूद केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande