
नवी दिल्ली, 17 ऑगस्ट (हिं.स.)। बिहारमधील लखीसराय जिल्ह्यातील अशोकधाम शिव मंदिरात झालेल्या दुर्घटनेप्रकरणी तसेच पश्चिम बंगालमधील बीरभूम जिल्ह्यातील आगीच्या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी पंतप्रधान राष्ट्रीय राहत निधीतून (पीएमएनआरएफ) आर्थिक मदत जाहीर केली. दोन्ही दुर्घटनांमध्ये मृत्युमुखी पडलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या निकटवर्तीयांना दोन लाख रुपये, तर जखमींना ५० हजार रुपयांची मदत देण्यात येणार आहे.
पंतप्रधान कार्यालयाने सोशल मीडिया मंच ‘एक्स’वरील पोस्टद्वारे या मदतीची माहिती दिली. लखीसराय येथील अशोकधाम शिव मंदिरात झालेल्या चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना दोन लाख रुपये आणि जखमींना ५० हजार रुपये देण्यात येतील. या दुर्घटनेतील जीवितहानीबद्दल पंतप्रधान मोदी यांनी तीव्र दुःख व्यक्त करत मृतांच्या कुटुंबीयांप्रति संवेदना व्यक्त केली असून जखमींच्या लवकर प्रकृतीत सुधारणा होण्यासाठी प्रार्थना केली. स्थानिक प्रशासन बाधितांना सर्वतोपरी सहाय्य करत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
दरम्यान, पश्चिम बंगालमधील बीरभूम जिल्ह्यात झालेल्या आगीच्या दुर्घटनेतील मृतांच्या निकटवर्तीयांनाही पीएमएनआरएफमधून दोन लाख रुपयांची मदत देण्याची घोषणा करण्यात आली आहे. या दुर्घटनेतील जखमींना प्रत्येकी ५० हजार रुपये देण्यात येणार आहेत. बीरभूममधील आगीच्या घटनेत झालेल्या जीवितहानीबद्दलही पंतप्रधानांनी शोक व्यक्त केला असून मृतांच्या कुटुंबीयांप्रति संवेदना व्यक्त केली आहे. तसेच जखमी नागरिकांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule