दक्षिण चीन समुद्रात अमेरिकन युद्धनौकेचा वीजपुरवठा ठप्प; चार दिवस बंद राहिले एसी, किचन व्यवस्था
वॉशिंग्टन, 17 ऑगस्ट (हिं.स.)।दक्षिण चीन समुद्रात नियमित गस्त घालत असताना अमेरिकन नौदलाच्या मार्गदर्शित क्षेपणास्त्रवाहू विनाशिका युएसएस बेनफोल्डला गंभीर तांत्रिक बिघाडाचा सामना करावा लागला.गेल्या महिन्यात, २४ जुलै रोजी जनरेटरमध्ये बिघाड झाल्याने सु
दक्षिण चीन समुद्रात अमेरिकन युद्धनौकेचा वीजपुरवठा ठप्प; चार दिवस बंद राहिले एसी, स्वयंपाकघर


वॉशिंग्टन, 17 ऑगस्ट (हिं.स.)।दक्षिण चीन समुद्रात नियमित गस्त घालत असताना अमेरिकन नौदलाच्या मार्गदर्शित क्षेपणास्त्रवाहू विनाशिका युएसएस बेनफोल्डला गंभीर तांत्रिक बिघाडाचा सामना करावा लागला.गेल्या महिन्यात, २४ जुलै रोजी जनरेटरमध्ये बिघाड झाल्याने सुमारे १० हजार टन वजनाच्या या युद्धनौकेचा वीजपुरवठा पूर्णपणे खंडित झाला.यामुळे जहाजावरील ३०० हून अधिक नौसैनिकांना सलग चार दिवस अत्यंत कठीण परिस्थितीत राहावे लागले. या काळात त्यांना स्वच्छतागृहे, वातानुकूलन (AC), गॅली सेवा (स्वयंपाकघर) आणि पुरेसे पिण्याचे पाणी यांसारख्या मूलभूत सुविधांपासून वंचित राहावे लागले. त्यावेळी या परिसरातील तापमान ३२ ते ३७ अंश सेल्सिअसदरम्यान होते. एवढ्या प्रचंड उष्णतेत एसी आणि इतर मूलभूत सुविधा बंद पडल्याने नौसैनिकांवर शारीरिक तसेच मानसिक ताण वाढला.

या बिघाडामुळे जहाजाच्या स्वतंत्रपणे कार्य करण्याच्या क्षमतेवरही परिणाम झाला. मात्र, अमेरिकन नौदलाच्या ७व्या ताफ्यातील अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, या संकटाच्या काळात युएसएस रॉबर्ट स्मॉल्स आणि युएसएस जॉर्ज वॉशिंग्टन कॅरिअर स्ट्राइक ग्रुपमधील इतर जहाजांनी बेनफोल्डवरील नौसैनिकांना अन्न आणि आवश्यक मदत पुरवली.त्यानंतर या युद्धनौकेला दुरुस्तीसाठी फिलिपाइन्समधील सुबिक बे येथे नेण्यात आले. ८ ऑगस्टपर्यंत दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर ती पुन्हा सेवेत तैनात करण्यात आली. नौदलाने स्पष्ट केले आहे की, या घटनेत कोणताही नौसैनिक जखमी झाला नाही. या तांत्रिक बिघाडामागील कारणांचा सविस्तर तपास सुरू आहे.

इंडो-पॅसिफिक क्षेत्रात यावर्षी अमेरिकन नौदलाच्या विनाशिकेतील वीजपुरवठा खंडित होण्याची ही दुसरी मोठी घटना आहे. यापूर्वी मे महिन्यात युएसएस हिगिन्सचीही काही तासांसाठी वीज आणि प्रणोदन प्रणाली बंद पडली होती. त्यामुळे काही काळ या युद्धनौकेला समुद्रात आपली दिशा बदलणेही शक्य झाले नव्हते. आर्ले बर्क-क्लासमधील या दोन्ही विनाशिका अमेरिकन नौदलाच्या सरफेस फ्लीटचा कणा मानल्या जातात.

अमेरिकन नौदलावर जगभरातील विविध मोहिमा आणि जबाबदाऱ्या तसेच मध्य पूर्वेत इराणसोबत सुरू असलेल्या तणावामुळे मोठा दबाव असताना ही तांत्रिक समस्या समोर आली आहे. दीर्घकाळापासून तैनात असलेल्या युएसएस अब्राहम लिंकनची जागा घेण्यासाठी अमेरिकन नौदल आता युएसएस जॉर्ज वॉशिंग्टनला पश्चिम प्रशांत क्षेत्रातून मध्य पूर्वेत पाठवण्याच्या तयारीत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande