
नवी दिल्ली, १७ ऑगस्ट (हिं.स.) : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना पत्र लिहून, राज्यातील आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या प्रतिनिधींना वैयक्तिकरित्या भेटण्याची विनंती केली आहे. त्यांच्या उर्वरित चिंता दूर करण्यासाठी त्यांच्याशी संवाद साधल्यास सरकारची वचनबद्धता अधिक दृढ होईल, असे ते म्हणाले.
हेमंत सोरेन यांना लिहिलेल्या पत्रात राहुल गांधींनी म्हटले आहे की, शांततापूर्ण आंदोलनाचा अधिकार संविधानात नमूद आहे आणि तो लोकशाहीच्या प्रमुख स्तंभांपैकी एक आहे. गेल्या काही महिन्यांत देशाच्या शिक्षण व्यवस्थेतील पेपरफुटी आणि अनियमिततेचे अहवाल समोर आले आहेत. त्यांचा विश्वास आहे की, एक दशकापूर्वी ज्ञाननिर्मिती करणारी प्रणाली असलेली शिक्षण व्यवस्था आता विद्यार्थ्यांचे शोषण आणि छळ करण्याचे माध्यम बनत आहे.
राहुल गांधींनी म्हटले आहे की, झारखंडमधील विद्यार्थी राज्यातील भरती परीक्षांमधील अनियमिततेच्या विरोधात आंदोलन करत आहेत. विद्यार्थ्यांचे आंदोलन शांततापूर्ण आहे आणि त्यांना आपल्या मागण्या लोकशाही मार्गाने मांडायच्या आहेत. त्यांनी पत्रात म्हटले आहे की, राज्य सरकारने विद्यार्थ्यांशी चर्चा केली असून त्यांच्या अनेक मागण्या मान्य केल्या आहेत, याची त्यांना जाणीव आहे. तथापि, त्यांनी नमूद केले की आंदोलन अजूनही सुरू असून काही विद्यार्थी अनिश्चित काळासाठी उपोषणावर आहेत.
राहुल गांधी यांनी मुख्यमंत्री सोरेन यांना आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या प्रतिनिधींना वैयक्तिकरित्या भेटण्याचे आवाहन केले. यामुळे विद्यार्थ्यांच्या उर्वरित चिंता दूर करण्याच्या सरकारच्या वचनबद्धतेला अधिक बळकटी मिळेल. त्यांनी पत्रात म्हटले आहे की, भारताची तरुण पिढी हे देशाचे भविष्य आहे. त्यांनी सध्याच्या संकटात विद्यार्थ्यांप्रति एकजूट आणि पाठिंबा व्यक्त केला आणि मुख्यमंत्र्यांना त्यांचे म्हणणे ऐकून घेऊन त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी योग्य पावले उचलण्याची विनंती केली.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे