लक्ष्मी मित्तल यांच्या स्टील प्लांटवर रशियाचा हल्ला; दोघांचा मृत्यू तर 14 कर्मचारी जखमी; उत्पादन ठप्प
नवी दिल्ली , 17 ऑगस्ट (हिं.स.)।भारतीय अब्जाधीश उद्योगपती आणि ‘स्टील किंग’ म्हणून ओळखले जाणारे लक्ष्मी मित्तल यांच्या कंपनीच्या आर्सेलरमित्तल क्रिव्ही रिह या प्रकल्पावर रशियाने केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात दोन जणांचा मृत्यू झाला असून १४ कर्मचारी ज
लक्ष्मी मित्तल यांच्या स्टील प्लांटवर रशियाचा हल्ला; दोघांचा मृत्यू तर 14 कर्मचारी जखमी; उत्पादन ठप्प


नवी दिल्ली , 17 ऑगस्ट (हिं.स.)।भारतीय अब्जाधीश उद्योगपती आणि ‘स्टील किंग’ म्हणून ओळखले जाणारे लक्ष्मी मित्तल यांच्या कंपनीच्या आर्सेलरमित्तल क्रिव्ही रिह या प्रकल्पावर रशियाने केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात दोन जणांचा मृत्यू झाला असून १४ कर्मचारी जखमी झाले आहेत. या हल्ल्यात मित्तल यांच्या कंपनीच्या प्रकल्पातील उत्पादनाशी संबंधित अनेक महत्त्वाच्या सुविधांचे नुकसान झाले. त्यामुळे प्रकल्पातील उत्पादन प्रक्रिया थांबवावी लागली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हा हल्ला युक्रेनमधील क्रिव्ही रिह शहरात असलेल्या देशातील सर्वात मोठ्या स्टील प्रकल्पावर झाला. क्रिव्ही रिह हे युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांचे गृहनगर आहे. रशिया आणि युक्रेनमधील सुरू असलेल्या युद्धादरम्यान या भागाला वारंवार लक्ष्य करण्यात आले आहे. मात्र, ताज्या हल्ल्याचा औद्योगिक उत्पादनावर मोठा परिणाम झाल्याचे मानले जात आहे.

आर्सेलरमित्तल क्रिव्ही रिहने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, क्षेपणास्त्र हल्ल्यात वीज निर्मिती आणि ब्लास्ट फर्नेसच्या संचालनाशी संबंधित महत्त्वाच्या सुविधांचे नुकसान झाले आहे. या महत्त्वाच्या युनिट्सचे नुकसान झाल्यामुळे उत्पादन प्रक्रिया विस्कळीत झाली असून प्रकल्पाचे कामकाज अंशतः थांबवावे लागले आहे.कंपनीने म्हटले, “हल्ल्यामुळे ऊर्जा निर्मिती आणि ब्लास्ट फर्नेस विभागातील प्रमुख उत्पादन सुविधांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे प्रकल्पातील उत्पादन प्रक्रिया अंशतः ठप्प झाली आहे.”

रशिया आणि युक्रेनदरम्यान लांब पल्ल्याच्या हल्ल्यांमध्ये वाढ झालेल्या काळात हा हल्ला झाला आहे. अलीकडच्या काही दिवसांत दोन्ही देशांकडून मोठ्या प्रमाणावर ड्रोन हल्ले करण्यात आले असून ऊर्जा, औद्योगिक आणि लष्करी पायाभूत सुविधांना लक्ष्य केले जात आहे.

युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी आरोप केला की, रशियन लष्कर सातत्याने नागरी आणि औद्योगिक पायाभूत सुविधांना लक्ष्य करत आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, गेल्या एका आठवड्यात रशियाने युक्रेनमधील विविध शहरांवर १,५५० हून अधिक हल्लेखोर ड्रोन, सुमारे १,५६० मार्गदर्शित बॉम्ब आणि ६२ क्षेपणास्त्रे डागली आहेत.

दुसरीकडे, मिळालेल्या माहितीनुसार, रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने सांगितले की, क्रिव्ही रिह येथील धातुकर्म प्रकल्प आणि कीव्हमधील काही लष्करी-औद्योगिक आस्थापने त्यांच्या लक्ष्यांमध्ये होती. रशियाने युक्रेनकडून डागण्यात आलेले ८२२ ड्रोन पाडल्याचा दावाही केला आहे.

आर्सेलरमित्तल क्रिव्ही रिह हा युक्रेनमधील सर्वात महत्त्वाच्या औद्योगिक प्रकल्पांपैकी एक असून तो जागतिक स्टील कंपनी आर्सेलरमित्तलचा भाग आहे. युक्रेनच्या स्टील उत्पादन आणि निर्यातीत या प्रकल्पाची महत्त्वाची भूमिका आहे. त्यामुळे वीज निर्मिती आणि ब्लास्ट फर्नेसशी संबंधित सुविधांचे झालेले नुकसान प्रकल्पाच्या उत्पादन क्षमतेवर गंभीर परिणाम करू शकते.

दरम्यान, युक्रेननेही रशियाच्या हद्दीत ड्रोन हल्ल्यांची तीव्रता वाढवली आहे. दोन्ही देशांमधील संघर्ष आता ऊर्जा प्रकल्प, औद्योगिक आस्थापना आणि सामरिक पायाभूत सुविधांवर अधिक व्यापक परिणाम करत आहे. त्यामुळे या संघर्षाचा प्रादेशिक आर्थिक घडामोडींवरही परिणाम होण्याची शक्यता वाढली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande