
वॉशिंग्टन , 17 ऑगस्ट (हिं.स.)।अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सौदी अरेबिया, तुर्किये आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या संरक्षण कराराचे कौतुक केले आहे. त्यांनी या कराराला स्वतःची सुरक्षा सुनिश्चित करण्याच्या दिशेने उचललेले मोठे, धाडसी आणि महत्त्वपूर्ण पाऊल असे म्हटले आहे. या तिन्ही देशांनी ‘मक्का संयुक्त संरक्षण करारा’वर स्वाक्षरी केल्यानंतर काही दिवसांनी ट्रम्प यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.या करारानुसार, तिन्हीपैकी कोणत्याही एका देशावर सशस्त्र हल्ला झाल्यास तो तिन्ही देशांवर झालेला हल्ला मानला जाईल.
ट्रम्प यांनी ‘ट्रुथ सोशल’वरील पोस्टमध्ये म्हटले, “सौदी अरेबिया, तुर्किये आणि पाकिस्तानने अलीकडेच मक्का संयुक्त संरक्षण करारावर स्वाक्षरी केल्याचे पाहून मला खूप आनंद झाला. यावरून मध्यपूर्व कशा प्रकारे एकत्रित होत आहे आणि हे देश अखेर अधिक प्रभावी पद्धतीने स्वतःची सुरक्षा कशी सुनिश्चित करू शकतील, हे दिसून येते.” ट्रम्प यांनी पुढे लिहिले, “या तिन्ही देशांच्या महान नेतृत्वाचे अभिनंदन. हे एक मोठे, धाडसी आणि महत्त्वपूर्ण पहिले पाऊल आहे.”
अमेरिकेच्या नेतृत्वाखालील नाटो या लष्करी संघटनेच्या कलम ५ नुसार, एखाद्या सदस्य देशावर झालेला सशस्त्र हल्ला हा संपूर्ण संघटनेवर झालेला हल्ला मानला जातो. पाकिस्तान, सौदी अरेबिया आणि तुर्किये यांच्यात झालेल्या संरक्षण कराराची मूलभूत संकल्पनाही याच धर्तीवर आहे.याच कारणामुळे या नव्या संरक्षण आघाडीला ‘मुस्लिम नाटो’ किंवा ‘इस्लामिक नाटो’ असे संबोधले जात आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode