ट्रम्प यांचे दक्षिण कोरियासोबतच्या संयुक्त लष्करी सरावात कपात करण्याचे आदेश
वॉशिंग्टन , 17 ऑगस्ट (हिं.स.)।अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रविवारी पेंटागॉनला दक्षिण कोरियासोबत होणाऱ्या संयुक्त लष्करी सरावात कपात करण्याचे आदेश दिले. इराणविरोधातील अमेरिकेच्या प्रयत्नांना दक्षिण कोरियाने सहकार्य करण्यास नकार दिल
ट्रम्प यांचे दक्षिण कोरियासोबतच्या संयुक्त लष्करी सरावात कपात करण्याचे आदेश


वॉशिंग्टन , 17 ऑगस्ट (हिं.स.)।अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रविवारी पेंटागॉनला दक्षिण कोरियासोबत होणाऱ्या संयुक्त लष्करी सरावात कपात करण्याचे आदेश दिले. इराणविरोधातील अमेरिकेच्या प्रयत्नांना दक्षिण कोरियाने सहकार्य करण्यास नकार दिल्याचे तसेच या लष्करी सरावांमुळे उत्तर कोरियाला मिळणारे ‘शत्रुत्वपूर्ण संकेत’ हे या निर्णयामागचे कारण असल्याचे ट्रम्प यांनी सांगितले.

ट्रम्प यांनी सोशल मीडियावरील एका पोस्टमध्ये म्हटले, “मी नुकतेच दक्षिण कोरियाच्या राष्ट्राध्यक्षांना इराणला अण्वस्त्रमुक्त करण्याच्या अमेरिकेच्या प्रयत्नांमध्ये सहभागी होण्यास सांगितले होते. त्यावर त्यांनी ‘नाही, धन्यवाद!’ असे उत्तर दिले.”

ट्रम्प यांनी पुढे लिहिले की, या आठवड्यात सुरू होणारे लष्करी सराव केवळ खर्चिकच नाहीत, तर उत्तर कोरियाला पूर्णपणे अनुचित आणि शत्रुत्वपूर्ण संकेत देणारे आहेत. त्यांनी म्हटले की, व्हाइट हाऊसमधील त्यांच्या कार्यकाळात उत्तर कोरियाचे वर्तन “कोणताही धोका नसलेले आणि सन्मानजनक” राहिले आहे. ट्रम्प यांनी पुढे सांगितले की, हा सराव रद्द करण्यास आता खूप उशीर झाला आहे. त्यामुळे त्यांनी अमेरिकेचे संरक्षण मंत्री पीट हेगसेथ यांना दक्षिण कोरियासोबतच्या संयुक्त लष्करी सरावात मोठ्या प्रमाणात कपात करण्याचे निर्देश दिले आहेत.

दरम्यान, उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग उन यांनी शुक्रवारी या लष्करी सरावांचा निषेध केला. त्यांनी हे सराव आक्रमक युद्धाची तयारी असल्याचे म्हटले असून, अमेरिका आणि दक्षिण कोरियाविरोधात अनिर्दिष्ट प्रत्युत्तरात्मक कारवाईचा इशाराही दिला. अमेरिकी लष्कराने सांगितले की, हे सराव दोन्ही देशांमधील लष्करी आघाडी अधिक मजबूत करण्यासाठी आयोजित केले जात आहेत. यामध्ये प्रत्यक्ष गोळीबाराचे सराव, अचूक लक्ष्यभेदन आणि युद्धाभ्यास, पाण्याने भरलेल्या मार्गातून सैन्याला पुढे नेणे तसेच पूर्वी तैनात केलेल्या लष्करी उपकरणांचे वितरण अशा विविध जटिल संयुक्त कारवायांचा समावेश आहे.

उत्तर कोरियाने पुन्हा बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांच्या चाचण्या सुरू केल्यानंतर काही दिवसांतच हे लष्करी सराव होत आहेत. या महिन्याच्या सुरुवातीला दक्षिण कोरिया, अमेरिका आणि जपानने उत्तर कोरियाकडून डागण्यात आलेल्या अल्प पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची माहिती घेतली होती. जूनच्या अखेरनंतर उत्तर कोरियाने केलेली ही अशा प्रकारची पहिली क्षेपणास्त्र चाचणी होती.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande