
परभणी, 18 ऑगस्ट, (हिं.स.)। महाराष्ट्र तलवारबाजी असोसिएशनच्या वतीने आयोजित ७ वी चाईल्ड व १८ वी मिनी राज्यस्तरीय तलवारबाजी स्पर्धा यंदा परभणीत होणार आहे. दि. २१ ते २३ ऑगस्ट २०२६ दरम्यान जिल्हा क्रीडा संकुल, परभणी येथील इनडोअर हॉलमध्ये या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
या स्पर्धेच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी जिल्हा क्रीडा संकुलातील इनडोअर हॉलची पाहणी करण्यात आली. यावेळी प्रा. डॉ. प्रदीप तळवेकर, प्रा. डॉ. पंढरीनाथ रोकडे, माजी जिल्हा क्रीडा अधिकारी गोकुळ तांदळे, प्रशांत जगताप, प्रा. डॉ. पांडुरंग रणमाळ, कैलास माने, नाटकर आदी उपस्थित होते.३६ जिल्ह्यांतील ७०० खेळाडूंचा सहभाग परभणी जिल्हा तलवारबाजी असोसिएशनला वार्षिक सर्वसाधारण सभेत यंदाच्या राज्यस्तरीय स्पर्धेच्या आयोजनाचा मान मिळाला आहे. या स्पर्धेत महाराष्ट्रातील तब्बल ३६ जिल्ह्यांमधून मुला-मुलींचे संघ सहभागी होणार आहेत. सुमारे ६०० ते ७०० खेळाडू स्पर्धेत सहभागी होण्याची शक्यता असून यजमान परभणी जिल्ह्याचा संघही स्पर्धेत आपले कौशल्य पणाला लावणार आहे. स्पर्धेसाठी महाराष्ट्र तलवारबाजी असोसिएशनचे राज्य कार्यकारिणी पदाधिकारी, पंच तसेच विविध जिल्ह्यांचे सचिव उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे परभणीला राज्यातील युवा तलवारबाजांचे कौशल्य पाहण्याची संधी मिळणार आहे.खेळाडूंच्या निवास-भोजनाची मोफत व्यवस्था स्पर्धेसाठी येणाऱ्या सर्व खेळाडू, पंच व पदाधिकाऱ्यांच्या निवास व भोजनाची मोफत व्यवस्था परभणी जिल्हा तलवारबाजी असोसिएशन आणि वसुंधरा महाविद्यालय, घाटनांदूर यांच्या वतीने करण्यात आली आहे. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी विविध स्तरांवर नियोजन करण्यात येत असून, आयोजनासाठी आवश्यक तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. परभणी जिल्ह्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या राज्यस्तरीय स्पर्धेला प्रतिसाद द्यावा तसेच स्पर्धा संयोजकांना सहकार्य करावे, असे आवाहन परभणी जिल्हा तलवारबाजी संघटनेचे अध्यक्ष अॅड. दिपकराव देशमुख, अजय देशमुख, अनिल देशमुख, सुशील देशमुख आणि जिल्हा संघटनेचे सचिव प्रा. डॉ. पांडुरंग रणमाळ यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis