
रत्नागिरी, 18 ऑगस्ट (हिं.स.) । दापोली तील श्री गोपाळकृष्ण ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेतील २०१८-१९ ते २०२२-२३ या कालावधीतील कथित गैरव्यवहार, बनावट कागदपत्रांच्या आधारे कर्जवाटप आणि ठेवीदारांच्या रकमेचा अपहार केल्याच्या आरोपांप्रकरणी दापोली पोलीस ठाण्यात १३ जणांविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी श्रीमती श्रिया जीवन झगडे यांनी फिर्याद दिली असून त्यांच्या तक्रारीवरून दापोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींमध्ये प्रसाद सूर्यकांत मेहता, सुधीर सदानंद तलाठी, राकेश प्रकाश कोटिया, संजय उमेशचंद्र बुटाला, संजय वसंत साबळे, अतुल काळुराम मेहता, शैला प्रभाकर मेहता, सुप्रिया बाळकृष्ण तलाठी, माधवी माधव शेट्ये, रमेश भागोजी गिम्हवणेकर, सुनील पांडुरंग धोपट, भिकू रामचंद्र मोरे आणि हेमंत आत्माराम केळेकर यांचा समावेश आहे.
फिर्यादीच्या माहितीनुसार, सहकारी संस्था उपजिल्हा उपनिबंधकांच्या १४ ऑगस्ट २०२४ च्या आदेशान्वये पतसंस्थेचे संबंधित कालावधीतील लेखापरीक्षण करण्यात आले. या लेखापरीक्षणादरम्यान संस्थेचे संचालक मंडळ, व्यवस्थापक आणि कर्ज अधिकाऱ्यांनी संगनमत करून कर्जासाठी सादर करण्यात आलेली कागदपत्रे बनावट असल्याची माहिती असतानाही त्याआधारे कर्ज मंजूर करून संस्थेच्या उपविधीतील नियमांचा भंग केल्याचे निदर्शनास आल्याचा आरोप करण्यात आला आहे.
कर्जवाटपाच्या प्रक्रियेत कथित अनियमितता करून संस्थेच्या ठेवीदारांच्या विश्वासाचा गैरफायदा घेत त्यांच्या ठेवींना गैरहानी पोहोचविण्याच्या उद्देशाने अपहार केल्याचा आरोपही तक्रारीत करण्यात आला आहे. या प्रकरणी भारतीय दंड संहिता आणि महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी