
अकोला, 18 ऑगस्ट (हिं.स.) : वाईन बार सुरू करण्यासाठी आवश्यक असलेल्या ना हरकत प्रमाणपत्राच्या (एनओसी) पडताळणीसाठी ३५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना चान्नी पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने मंगळवारी रंगेहात पकडले. ही कारवाई चान्नी पोलीस ठाण्यात करण्यात आली.
महादेव मधुकरराव देशमुख (वय ५७), पोलीस उपनिरीक्षक, चान्नी पोलीस ठाणे, ता. पातूर, जि. अकोला असे कारवाई करण्यात आलेल्या लोकसेवकाचे नाव आहे. ते अकोला शहरातील बाजोरिया नगर, हिंगणा रोड परिसरात वास्तव्यास असल्याची माहिती ACB कडून देण्यात आली.
एसीबीकडून मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदाराचा पांगरा रोड, मळसूर येथील भूमिपुत्र बियर अँड वाईन शॉपचा व्यवसाय आहे. वाईन बार सुरू करण्यासाठी तक्रारदाराने राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे अर्ज केला होता. या अर्जाच्या अनुषंगाने चान्नी पोलीस ठाण्याकडून NOCसाठी पडताळणी करण्यात येत होती.
या प्रक्रियेदरम्यान पोलीस उपनिरीक्षक महादेव देशमुख आणि ठाणेदार दराडे यांच्या नावाने ६५ हजार रुपयांची लाच मागितल्याची तक्रार १२ ऑगस्ट रोजी एसीबीकडे करण्यात आली. तक्रारीची १२, १५ आणि १७ ऑगस्ट रोजी मळसूर येथे पडताळणी करण्यात आली. त्यानंतर तडजोडीतून ठाणेदारांसाठी ३० हजार आणि स्वतःसाठी ५ हजार, अशी एकूण ३५ हजार रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले.
दरम्यान, तक्रारदाराने ठाणेदार दराडे यांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली असता, त्यांना भेटण्याची आवश्यकता नसल्याचे देशमुख यांनी सांगितल्याचे एसीबीने स्पष्ट केले. ठाणेदार दराडे यांची स्वतंत्र पडताळणी केली असता त्यांनी एनओसीसाठी पैशांची मागणी केली नसल्याचे निष्पन्न झाले.
ठरल्याप्रमाणे मंगळवारी सकाळी सुमारे १०.३७ वाजता चान्नी पोलीस ठाण्यातील खुफिया कक्षात देशमुख यांनी ३५ हजार रुपयांची लाच स्वीकारली. त्याचवेळी एसीबी पथकाने कारवाई करून त्यांना रंगेहात पकडले.
या प्रकरणी भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यातील कलम ७ अन्वये चान्नी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू आहे. आरोपीला एसीबीने ताब्यात घेतले असून, गुन्हा दाखल झाल्यानंतर अटकेची कार्यवाही करण्यात येणार आहे. तसेच आरोपीच्या घराची झडती घेण्याची कारवाई सुरू असल्याचे एसीबीने सांगितले.
--------------------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे