
केपीएससी भरती घोटाळा प्रकरणी केली कारवाई
बंगळुरू, 18 ऑगस्ट (हिं.स.) : कर्नाटक लोकसेवा आयोगाच्या (केपीएससी) पशुवैद्यकीय अधिकारी भरती प्रक्रियेत कथित भ्रष्टाचार झाल्याच्या आरोपांप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मोठी कारवाई केली आहे. मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत (पीएमएलए) ईडीच्या पथकांनी कर्नाटकातील तब्बल 13 ठिकाणी छापेमारी करून झडती सुरू केली आहे.
या कारवाईदरम्यान शिवशंकरप्पा साहूकार यांच्या घरासह मध्यस्थांच्या ठिकाणांचीही तपासणी करण्यात येत आहे. या प्रकरणात मध्यस्थ म्हणून समोर आलेल्या अली आणि सिकंदर यांच्या निवासस्थानीही ईडीकडून झडती घेतली जात आहे. केपीएससीच्या पशुवैद्यकीय अधिकारी भरती प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झाल्याचे आरोप करण्यात आले आहेत. एकूण 400 पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबविण्यात आली होती. यामध्ये 342 नियमित आणि 58 बॅकलॉग पदांचा समावेश होता.
उमेदवारांनी आरोप केला आहे की, अंतिम निवड यादीत नाव समाविष्ट करून देण्याच्या मोबदल्यात कथित मध्यस्थांकडून 80 लाख रुपयांपर्यंतची मागणी करण्यात आली. पैसे दिल्यास निवड निश्चित करून देण्याचे आश्वासन काही व्यक्तींनी दिल्याचा दावाही उमेदवारांनी केला आहे.
भरती प्रक्रियेत एजंट आणि मध्यस्थांच्या माध्यमातून फेरफार करण्यात आल्याचा आरोप उमेदवारांकडून करण्यात आला आहे. त्यामुळे पात्र उमेदवारांवर अन्याय झाल्याचेही त्यांचे म्हणणे आहे. दरम्यान, शिवशंकरप्पा साहूकार यांनी जामिनासाठी उच्च न्यायालयात धाव घेतल्यानंतर ईडीने ही कारवाई सुरू केल्याची माहिती समोर आली आहे. कथित आर्थिक गैरव्यवहार आणि पैशांच्या देवाणघेवाणीच्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर ईडीकडून या प्रकरणाचा तपास करण्यात येत आहे.या छापेमारीत कोणती कागदपत्रे किंवा अन्य पुरावे ईडीच्या हाती लागले, तसेच या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याबाबत तपासानंतर अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.
--------------------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी