
रायगड, 18 ऑगस्ट (हिं.स.)। : पेण पोलीस ठाण्याच्या हद्दीत अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पेण पोलीस ठाण्यात संबंधित आरोपीविरुद्ध पॉक्सो कायद्यासह भारतीय न्यायसंहितेच्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मौजे शेणे गावातील नदीच्या कुसाजवळ (काठाजवळ), पो. सावरसई, ता. पेण येथे हा प्रकार घडला. आरोपी हा राठीचीवाडी, पो. आंबेघर, ता. पेण येथील रहिवासी असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. फिर्यादी अल्पवयीन असल्याची माहिती आरोपीला असतानाही त्याने तिला लग्नाचे आमिष दाखविले. त्यानंतर तिच्याशी वारंवार शारीरिक संबंध ठेवले. या प्रकारातून अल्पवयीन मुलगी गर्भवती झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
या घटनेनंतर पीडित मुलीच्या तक्रारीवरून पेण पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक २००/२०२६ दाखल करण्यात आला आहे. आरोपीविरुद्ध बाल लैंगिक अत्याचार संरक्षण (POCSO) अधिनियम, २०१२ मधील कलम ४ व ६ तसेच भारतीय न्यायसंहिता, २०२३ मधील कलम ६४(२)(i), ६४(२)(m) आणि ६५(१) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास अधिकाऱ्यांकडून सुरू असून, घटनेशी संबंधित बाबींचा तपास केला जात आहे. अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराच्या या गंभीर प्रकरणामुळे पेण परिसरात खळबळ उडाली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)