टेक्नोने पोवा ८ प्रो ५जी स्मार्टफोन भारतात केला लॉन्च
मुंबई, 19 ऑगस्ट (हिं.स.)। टेक्नो कंपनीने भारतात आपला नवीन स्मार्टफोन टेक्नो पोवा ८ प्रो ५जी लॉन्च केला आहे. पोवा ८ मालिकेतील हा नवीनतम स्मार्टफोन असून, काही महिन्यांपूर्वी लॉन्च झालेल्या पोवा ८ नंतर प्रो व्हर्जन भारतीय बाजारात दाखल झाले आहे. आकर्ष
Techno company launches Powa 8 Pro 5G smartphone India


मुंबई, 19 ऑगस्ट (हिं.स.)। टेक्नो कंपनीने भारतात आपला नवीन स्मार्टफोन टेक्नो पोवा ८ प्रो ५जी लॉन्च केला आहे. पोवा ८ मालिकेतील हा नवीनतम स्मार्टफोन असून, काही महिन्यांपूर्वी लॉन्च झालेल्या पोवा ८ नंतर प्रो व्हर्जन भारतीय बाजारात दाखल झाले आहे. आकर्षक डिझाइन, दमदार बॅटरी, उच्च रिफ्रेश रेट असलेला डिस्प्ले आणि शक्तिशाली प्रोसेसर यामुळे हा फोन मध्यम श्रेणीतील ग्राहकांसाठी महत्त्वाचा पर्याय ठरण्याची शक्यता आहे.

टेक्नो पोवा ८ प्रो ५जी ची भारतातील सुरुवातीची किंमत ४९ हजार ९९९ रुपये आहे. निवडक क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड आणि यूपीआय पेमेंटवर ३ हजार रुपयांपर्यंत इन्स्टंट कॅशबॅक मिळणार आहे. या स्मार्टफोनची विक्री २१ ऑगस्टपासून फ्लिपकार्टवर सुरू होईल. आर्क व्हाइट, ग्रेफाइट ब्लॅक आणि टुंड्रा ग्रीन अशा तीन रंगांमध्ये हा फोन उपलब्ध होणार आहे.

फोनमध्ये ६.७८ इंचांचा हायपरलक्स अमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. या स्क्रीनला १४४ हर्ट्झ रिफ्रेश रेट, १,२०८ बाय २,६४४ पिक्सेल्स रिझोल्यूशन आणि ४ हजार ५०० निट्सपर्यंत पीक ब्राइटनेस मिळतो. धूळ आणि पाण्यापासून संरक्षणासाठी फोनला आयपी ६९ के रेटिंग देण्यात आले आहे.

कामगिरीसाठी फोनमध्ये ४ नॅनोमीटर तंत्रज्ञानावर आधारित मीडियाटेक डायमेन्सिटी ७४०० अल्टिमेट प्रोसेसर देण्यात आला आहे. यासोबत टेक्नो पी १ ग्राफिक्स चिप, एआरएम माली जी ६१५ एमसी २ जीपीयू आणि व्हेपर चेंबर कूलिंग सिस्टम मिळते. मोठ्या हीट डिसिपेशन क्षेत्रामुळे गेमिंग आणि हेवी वापरादरम्यान फोनचे तापमान नियंत्रणात ठेवण्याचा दावा कंपनीने केला आहे.

कॅमेरा विभागात मागील बाजूस ५० मेगापिक्सेलचा मुख्य कॅमेरा ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशनसह देण्यात आला आहे. त्याला ८ मेगापिक्सेलच्या अल्ट्रावाइड कॅमेऱ्याची जोड आहे, तर सेल्फीसाठी १३ मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा मिळतो. फोनच्या मागील बाजूस १७७ मिनी एलईडी असलेला अलाइव्ह मॅट्रिक्स डिस्प्ले देण्यात आला असून, विविध परिस्थितींमध्ये ब्रीदिंग लाइट इफेक्ट दिसतो.

बॅटरीसाठी ६ हजार ५०० एमएएच क्षमतेची बॅटरी असून, ४५ वॉट वायर्ड फास्ट चार्जिंगचा सपोर्ट आहे. कनेक्टिव्हिटीसाठी ५जी, वाय-फाय ६, ब्लूटूथ ५.४, यूएसबी टाइप-सी आणि एनएफसी यांसारखी फीचर्स मिळतात. हा फोन हायओएस १६ वर चालतो, जो अँड्रॉइड १६ वर आधारित आहे. कंपनीने दोन ऑपरेटिंग सिस्टम अपग्रेड आणि तीन वर्षांचे सिक्युरिटी अपडेट्स देण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे दमदार डिस्प्ले, मोठी बॅटरी आणि आकर्षक डिझाइनच्या जोरावर टेक्नो पोवा ८ प्रो ५जी भारतीय बाजारात चांगली स्पर्धा निर्माण करू शकतो.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande