
रायगड, 02 ऑगस्ट (हिं.स.)। : पोयनाड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मौजे पोयनाड येथील बसस्टॉपच्या मागील बाजूस असलेल्या बीएसएनएल रिमोट स्टेशन कार्यालयात अज्ञात चोरट्याने धाडसी चोरी करत सुमारे ९६ हजार रुपये किमतीचे ४८ बॅटरी सेल चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे.
याप्रकरणी फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, अज्ञात चोरट्याने बीएसएनएल रिमोट स्टेशन कार्यालयाच्या उघड्या खिडकीतून आत प्रवेश केला. त्यानंतर कार्यालयात बसविण्यात आलेले एच.बी.एल. कंपनीचे एकूण ४८ बॅटरी सेल, ज्यांची अंदाजे किंमत ९६ हजार रुपये आहे, ते कंपनीची परवानगी न घेता लबाडीच्या उद्देशाने चोरी करून नेले.
या प्रकरणी पोयनाड पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ८६/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा अधिक तपास पोलीस हवालदार सुरेश वाघमारे हे करीत आहेत. पोलीस परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तसेच इतर तांत्रिक पुराव्यांच्या आधारे आरोपींचा शोध घेत आहेत. चोरीमुळे बीएसएनएलच्या यंत्रणेच्या सुरक्षेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)