
लातूर, 02 ऑगस्ट (हिं.स.)। लातूर जिल्ह्यात मागील काही महिन्यांपासून घरफोडी व चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक अमोल तांबे व अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली मालमत्तेविरुद्धचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेकडून विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने दि. ०१ ऑगस्ट २०२६ रोजी केलेल्या दोन कारवायांमध्ये ३ सराईत आरोपी व १ विधीसंघर्षग्रस्त बालकास ताब्यात घेऊन कर्नाटक राज्यातील बिदर येथील एका गुन्ह्यासह तब्बल १५ घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणण्यास यश मिळविले आहे.
पहिल्या कारवाईत लातूर शहरातील रेल्वे स्टेशन चौक परिसरातून योगेश शंकर पवार (वय ४३, रा. बेळी, ता. मुखेड, जि. नांदेड, सध्या उमरगा) यास ताब्यात घेण्यात आले. चौकशीदरम्यान त्याने चाकूर येथील घरफोडीची कबुली देत कर्नाटक राज्यातील कमालनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चोरीचाही गुन्हा केल्याची माहिती दिली. त्याच्याकडून चोरीतील सोन्याची अंगठी व रोख रक्कम हस्तगत करण्यात आली. त्यानंतर दुसऱ्या कारवाईत चाकूर येथील आयटीआय महाविद्यालयासमोर सापळा रचून राजू जगन्नाथ शिंदे (रा. पांगरी, ता. परळी, जि. बीड) आणि कट्टप्पा हणमंत भोसले (रा. बोरी, ता. जिंतूर, जि. परभणी) तसेच एका विधीसंघर्षग्रस्त बालकास ताब्यात घेण्यात आले. चौकशीत आरोपींनी चाकूर, उदगीर शहर, उदगीर ग्रामीण, अहमदपूर, किनगाव, जळकोट तसेच इतर ठिकाणी रात्रीच्या वेळी बंद घरे फोडून चोरी केल्याची कबुली दिली.
आरोपींच्या चौकशीवरून चाकूर पोलीस ठाण्याचे ५, उदगीर ग्रामीणचे ३, उदगीर शहरचे २, अहमदपूरचे २, किनगावचे १, जळकोटचे १ तसेच कर्नाटक राज्यातील कमालनगर पोलीस ठाण्याचा १ अशा एकूण १५ घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले. या कारवाईत ७१ ग्रॅम सोन्याचे दागिने, ३२५ ग्रॅम चांदीचे दागिने व १,१५,३०० रोख रक्कम असा एकूण १२,३५,३०० किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. जप्त मुद्देमालामध्ये सोन्याच्या अंगठ्या, मंगळसूत्र, झुमके, कुड्या, पोत, सरपाळे, ओम पेंडंट, चांदीच्या साखळ्या, कडे, पैंजण, जोडवे, करंडे तसेच रोख रक्कमेचा समावेश आहे.
या कारवाईमुळे जिल्ह्यातील मालमत्तेविरुद्धच्या गुन्ह्यांचा उलगडा झाला असून, चोरीस गेलेला मुद्देमाल हस्तगत करून संबंधित पोलीस ठाण्यांच्या ताब्यात देण्यात आला आहे. आरोपींकडून आणखी काही घरफोडीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असून त्या अनुषंगाने पुढील तपास सुरू आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis