
बीड, 02 ऑगस्ट (हिं.स.)।
केज पोलीस ठाण्याच्या पथकाने अवैध दारू विक्रीविरोधात धडक कारवाई करत सुमारे ₹७४ हजार ७२० किमतीचा देशी-विदेशी मद्यसाठा जप्त केला असून एका आरोपीला ताब्यात घेतले आहे. या कारवाईमुळे परिसरातील अवैध दारू विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, १ ऑगस्ट २०२६ रोजी केज पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक लक्ष्मण उंबरे हे पथकासह हद्दीत पेट्रोलिंग करत असताना त्यांना गोपनीय माहिती मिळाली. उत्तरेश्वर पिंपरी येथील मंदिरासमोरील विजय हॉटेल परिसरात विनापरवाना देशी व विदेशी दारूची चोरटी विक्री सुरू असल्याची माहिती मिळताच त्यांनी ही बाब पोलीस निरीक्षक राहुल सूर्यतळ यांच्या निदर्शनास आणून दिली.
पोलीस निरीक्षक राहुल सूर्यतळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक लक्ष्मण उंबरे, ग्रेड पोलीस उपनिरीक्षक अमेर इनामदार तसेच पथकातील इतर कर्मचाऱ्यांनी दुपारी सुमारे ३.०५ वाजता संबंधित ठिकाणी अचानक छापा टाकला. विजय हॉटेलच्या मागील बाजूस असलेल्या #पत्र्याच्या शेडची तपासणी केली असता मोठ्या प्रमाणात देशी व विदेशी मद्याचा साठा आढळून आला.
या कारवाईत ब्ल्यू व्हिस्कीच्या ९५ बाटल्या, रॉयल स्टॅगच्या २४ बाटल्या, मॅकडॉवेल नं.१च्या ३७ बाटल्या, #किंगफिशर बिअरचे ५ बॉक्स, ट्युबॉर्ग बिअरचे २ बॉक्स, टँगो पंच देशी दारूच्या २१० बाटल्या आणि बॉबी संत्रा देशी दारूच्या ६५ बाटल्या असा एकूण ₹७४ हजार ७२० किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी प्रकाश शिवाजी बिडकर (वय ७५, रा. उत्तरेश्वर पिंपरी, ता. केज) याच्याविरुद्ध महाराष्ट्र #दारूबंदी कायद्यातील कलम ६५(ई) अन्वये केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक राहुल सूर्यतळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक पुरुषोत्तम शेप करीत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक #नवनीत कॉवत, अप्पर पोलीस अधीक्षक चेतना तिडके आणि सहाय्यक पोलीस अधीक्षक वेंकटराम यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. कारवाईत पोलीस निरीक्षक राहुल सूर्यतळ, सहाय्यक पोलीस निरीक्षक लक्ष्मण उंबरे, ग्रेड पोलीस उपनिरीक्षक अमेर इनामदार तसेच बाळासाहेब अहंकारे, नितीन वारे, दादाराव देवगुडे, संतोष गीते आणि शिवाजी कागदे यांनी सहभाग घेतला.
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis