
बीड, 02 ऑगस्ट (हिं.स.)। नैसर्गिक मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याच्या नातेवाईकांनी एका तरुणावर हत्येचा खोटा गुन्हा दाखल करण्याची भीती घालून वीस लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पाच जणांविरोधात अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लोखंडी सावरगाव येथील मटण विक्रेते मुख्तार कय्युम कुरेशी (वय ६०) यांनी या प्रकरणी तक्रार दिली आहे. त्यानुसार, इसामिया मोसा कुरेशी या व्यक्तीचा अतिमद्यपानामुळे नैसर्गिक मृत्यू झाला होता. मात्र या घटनेचा गैरफायदा घेत मृत इसामिया याचे नातेवाईक शफी बाबू कुरेशी (वय ६०, रा. गातेगाव, जि. लातूर), अमीन कुरेशी (रा. सोनपेठ, जि. परभणी), जबीन इसामिया कुरेशी (वय ४०), फैजान इसामिया कुरेशी (वय २३) आणि मोहम्मद इसामिया कुरेशी (वय २१, सर्व रा. बाराबाई गल्ली, अंबाजोगाई) यांनी संगनमत केले.
अर्षकॉलनी येथे भरलेल्या न्यायपंचायतीत आरोपींनी तक्रारदाराच्या मुलावर व त्याच्या मित्रावर हत्येचा खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी देऊन २० लाखांची मागणी केली. पैसे देण्यास असमर्थता दर्शवली असता आरोपींनी अश्लील शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. विशेष म्हणजे आरोपींनी मृतदेह पोलीस ठाण्यासमोर नेऊन धरणे आंदोलन केले. त्यानंतर पोलिसांनी दिलेल्या निर्देशानुसार मृतदेह दफन करण्यात आला असला तरी, आरोपींनी खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी देऊन मानसिक त्रास कायम ठेवला व जबरदस्तीने रक्कम वसूल करण्याचा प्रयत्न केला.
या प्रकरणी तक्रारदाराच्या फिर्यादीवरून अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात शफी कुरेशी, अमीन कुरेशी, जबीन कुरेशी, फैजान कुरेशी आणि मोहम्मद कुरेशी यांच्याविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम १९०, ३०८(७), ३५१(२) आणि ३५२ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक शरद जोगदंड करत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis