
नवी दिल्ली, 20 ऑगस्ट (हिं.स.) - काँग्रेसचे माजी खासदार आणि नेते सज्जन कुमार यांचे गुरुवारी वयाच्या 80व्या वर्षी निधन झाले. मिळालेल्या माहितीनुसार, सज्जन कुमार यांना दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात मृतावस्थेत आणण्यात आले होते. 1984 च्या शीखविरोधी दंगलीशी संबंधित तीनपैकी दोन प्रकरणांमध्ये दोषी ठरल्यानंतर ते तिहार तुरुंगात जन्मठेपेची शिक्षा भोगत होते. एका प्रकरणात त्यांची निर्दोष मुक्तता झाली होती.
दिल्ली कँटोन्मेंटमधील पालम कॉलनीत पाच शिखांच्या हत्येनंतर गुरुद्वारा जाळल्याच्या प्रकरणात सज्जन कुमार दोषी आढळले होते. दिल्ली उच्च न्यायालयाने 17 डिसेंबर 2018 रोजी त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. सप्टेंबर 2023 मध्ये, राऊस ॲव्हेन्यू न्यायालयाने दिल्लीतील सुलतानपुरी येथे तीन शिखांच्या हत्येच्या प्रकरणात त्यांची निर्दोष मुक्तता केली होती. दंगलीतील सीबीआयची एक प्रमुख साक्षीदार, चाम कौर यांनी आरोप केला होता की सज्जन जमावाला भडकवत होते. सरदार जसवंत सिंग आणि त्यांचा मुलगा तरुंदीप सिंग यांची 1 नोव्हेंबर 1984 रोजी सरस्वती विहार येथे हत्या करण्यात आली. दंगलखोरांनी त्यांच्यावर लोखंडी सळ्या आणि काठ्यांनी हल्ला केला. त्यानंतर त्यांनी त्या दोन शिखांना जिवंत जाळले. त्यांना 12 फेब्रुवारी 2025 रोजी दोषी ठरवण्यात आले आणि २५ फेब्रुवारी रोजी जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली.
सफदरजंग रुग्णालयाने जारी केलेल्या निवेदनानुसार, ८४ वर्षीय सज्जन कुमार यांना पोलीस सकाळी ११ च्या सुमारास बेशुद्ध अवस्थेत व्हीएमएमसी आणि सफदरजंग रुग्णालयात घेऊन आले होते; त्यांना तातडीने दाखल करून त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले. सर्व आवश्यक वैद्यकीय आणि जीवनरक्षक उपाययोजना करूनही त्यांना वाचवता आले नाही आणि दुपारी १२:३० वाजता त्यांचे निधन झाले.
सज्जन कुमार हे काँग्रेसचे नेते होते आणि १९७० च्या दशकापासून दिल्लीच्या राजकारणात सक्रिय होते. त्यांनी १९७७ मध्ये पहिल्यांदा दिल्ली महानगरपालिकेची निवडणूक लढवली आणि ते नगरसेवक म्हणून निवडून आले. १९८० मध्ये, लोकसभा निवडणुकीत चौधरी ब्रह्म प्रकाश यांचा पराभव करून सज्जन कुमार पहिल्यांदाच खासदार बनले.
पंतप्रधान इंदिरा गांधी यांची 31 ऑक्टोबर 1984 रोजी हत्या झाली. दुसऱ्या दिवशी, 1 नोव्हेंबर रोजी, दिल्लीसह देशाच्या अनेक भागांमध्ये शीखविरोधी दंगली उसळल्या. एकट्या दिल्लीत अंदाजे 2,700 लोक मारले गेले. देशभरातील मृतांचा आकडा सुमारे 3,500 असल्याची माहिती समोर आली. मे 2000 मध्ये, दंगलींचा तपास करण्यासाठी नानावटी आयोगाची स्थापना करण्यात आली. 24 ऑक्टोबर 2005 रोजी, नानावटी आयोगाच्या शिफारशींच्या आधारे सीबीआयने गुन्हा दाखल केला. 1 फेब्रुवारी 2010 रोजी, सत्र न्यायालयाने काँग्रेस नेते सज्जन कुमार, बलवान खोकर, महेंद्र यादव, कॅप्टन भागमल, गिरधारी लाल, किशन खोकर, महा सिंग आणि संतोष राणी यांना समन्स बजावले. 30 एप्रिल 2013 न्यायालयाने सज्जन कुमार यांची निर्दोष मुक्तता केली. या निर्णयाविरुद्ध सीबीआयने 19 जुलै 2013 उच्च न्यायालयात अपील केले. 22 जुलै 2013 रोजी, उच्च न्यायालयाने सज्जन कुमार यांना नोटीस बजावली. 17 डिसेंबर 2018 रोजी, उच्च न्यायालयाने पाच शीखांच्या हत्या प्रकरणात सज्जन कुमार यांना दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली. दंगलीच्या 21 वर्षांनंतर पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी संसदेत माफी मागितली. ते म्हणाले, जे काही घडले त्यामुळे मला शरमेने मान खाली घालावी लागते.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी