
पुण्यात ‘छात्रो की गुंज’ कार्यक्रमात केले महिलांशी संबंधित मुद्यांवर भाष्य
पुणे, 22 ऑगस्ट (हिं.स.) : महिलांवर कुठल्याही पुरुषाचा अधिकार नाही. त्यांचे स्वातंत्र्य हीच देशाची ताकद असल्याचे प्रतिपादन काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी केले. काँग्रेसतर्फे शनिवारी पुण्यात आयोजित ‘छात्रो की गुंज’ या कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी राहुल यांनी दावा केले की, महिलांनी कधीच स्वतंत्र राहू नये हा विचार मनुस्मृतीतून पुढे आला आहे. तुम्ही स्वतःशिवाय कोणालाही बांधिल नाही. महिलांवर कोणत्याही पुरुषाचा अधिकार नाही. महिलांनी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय यश मिळवले असतानाही त्यांना ठराविक चौकटीत बसवले जात असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. या कार्यक्रमाची संकल्पना ‘पिंजरा तोडा’ अशी होती. महिलांवर लादण्यात येणारी सामाजिक बंधने आणि भेदभाव यावर राहुल गांधी यांनी भाष्य केले. मी इथे राजकारणावर बोलायला आलो नाही, असेही राहुल यांनी स्पष्ट केले. शिक्षणाच्या क्षेत्रातही मुलींना भेदभावाला सामोरे जावे लागत असल्याचे राहुल गांधी म्हणाले. शिक्षण घेताना तसेच नोकरी करताना महिलांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो, असे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमादरम्यान काही विद्यार्थिनींनी राहुल गांधी यांच्यासमोर आपले अनुभव मांडले. शिक्षण आणि रोजगाराच्या संधी, कुटुंबाकडून येणारी बंधने तसेच सार्वजनिक ठिकाणी प्रवास करताना महिलांना भेडसावणाऱ्या अडचणींबाबत त्यांनी माहिती दिली.महिलांवर मोठ्या प्रमाणात बंधने लादली जात असल्याचेही विद्यार्थिनींनी सांगितले. सार्वजनिक ठिकाणी सुरक्षित प्रवासाचा प्रश्न अद्याप गंभीर असल्याचे त्यांनी अनुभवातून मांडले. तर भारताची सर्वात मोठी ताकद काय आहे, यावर बोलताना राहुल गांधी यांनी देशातील तरुणांच्या विचारांकडे लक्ष वेधले. देशातील 70 कोटी लोकांची स्वप्ने आणि विचार हीच भारताची ताकद आहे, असे ते म्हणाले. देशातील मुली स्वतंत्र असणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, महिलांवरील हिंसाचार, आर्थिक स्वातंत्र्य आणि रोजगारातील असमानता यावरही राहुल गांधी यांनी चिंता व्यक्त केली. महिलांना आर्थिक हिंसाचारालाही सामोरे जावे लागत असल्याचे ते म्हणाले. महिलांना काम करण्यासाठी परवानगी घ्यावी लागते आणि पुरुषांच्या तुलनेत महिलांना कमी वेतन मिळते, असे दावेही त्यांनी यावेळी केले. पुण्याबद्दल बोलताना “पुणे म्हणजे प्रेम” असे म्हणत राहुल गांधी यांनी कार्यक्रमातील संवादात्मक वातावरणाचा उल्लेख केला. महिलांना समान संधी, स्वातंत्र्य आणि सन्मान मिळणे आवश्यक असल्याचा संदेश त्यांनी या कार्यक्रमातून दिला.
----------------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी