
रायपूर, २० ऑगस्ट (हिं.स.)ईडीने छत्तीसगडमधील धमतरी येथील सिहावा रोडवरील काँग्रेसचे माजी खजिनदार रामगोपाल अग्रवाल यांच्या निवासस्थानी छापा टाकला. ईडीचे पथक सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास दोन वेगवेगळ्या वाहनांमधून अग्रवाल यांच्या घरी पोहोचले.
या पथकात सुरक्षा कर्मचाऱ्यांसह आठ सदस्य आहेत. घराबाहेर सुरक्षा दल तैनात करण्यात आले असून, कोणालाही आत प्रवेश दिला जात नाही. अधिकारी घरातील कागदपत्रे आणि इतर महत्त्वाच्या नोंदींची तपासणी करत आहेत.सिंडिकेटने गोळा केलेल्या बेकायदेशीर कमिशनमध्ये आणि कोट्यवधी रुपयांच्या काळ्या पैशाच्या मनी लाँड्रिंगमध्ये रामगोपाल अग्रवाल यांनी महत्त्वाची भूमिका बजावली असल्याचा ईडीचा दावा आहे. काँग्रेस नेते रामगोपाल अग्रवाल सध्या रायपूर मध्यवर्ती कारागृहात आहेत.
छत्तीसगडमधील हाय-प्रोफाईल दारू आणि कोळसा उपकर घोटाळ्याच्या प्रकरणांमध्ये तपास यंत्रणांनी त्याची चौकशी आणि कोठडी पूर्ण केल्यानंतर, न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडीत पाठवले. तो आधीच खटला सुरू असलेला आरोपी म्हणून केंद्रीय कारागृहात होता. दरम्यान, ११ ऑगस्ट २०२६ रोजी ईडीने दारू घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात त्याला कारागृहातून औपचारिकपणे अटक केली. त्याच्या अटकेनंतर, विशेष पीएमएलए न्यायालयाने त्याला १८ ऑगस्टपर्यंत ईडीच्या कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे