
नवी दिल्ली , 20 ऑगस्ट (हिं.स.)।पाकिस्तानने बुधवारी भारतीय विमानांसाठी आपले हवाई क्षेत्र बंद ठेवण्याची मुदत 24 सप्टेंबरपर्यंत वाढवली आहे. एप्रिल 2025 मध्ये झालेल्या पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तान आणि भारताने एकमेकांच्या विमान कंपन्यांसाठी हवाई क्षेत्राशी संबंधित निर्बंध लागू केले होते.
पाकिस्तान विमानतळ प्राधिकरणाने जारी केलेल्या ‘नोटिस टू एअरमेन’ (नोटम ) मध्ये म्हटले आहे की, “पाकिस्तानचे हवाई क्षेत्र भारतात नोंदणीकृत विमानांसाठी तसेच भारतीय विमान कंपन्या किंवा ऑपरेटरद्वारे चालवली जाणारी किंवा भाडेतत्त्वावर घेतलेली विमाने, ज्यामध्ये लष्करी विमानांचाही समावेश आहे, यांच्यासाठी उपलब्ध राहणार नाही.” पाकिस्तानने हा निर्णय सध्याच्या निर्बंधांची मुदत 23 ऑगस्ट रोजी संपण्यापूर्वी घेतला आहे.
नोटमनुसार, वाढवलेली ही मुदत 23 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजून 15 मिनिटांपासून लागू होईल आणि 24 सप्टेंबर रोजी पहाटे 4 वाजून 59 मिनिटांपर्यंत प्रभावी राहील. पाकिस्तान नागरी विमान वाहतूक प्राधिकरणाच्या 2022 मधील एका दस्तऐवजानुसार, पाकिस्तानचे हवाई क्षेत्र कराची आणि लाहोर या दोन ‘फ्लाइट इन्फॉर्मेशन रिजन’मध्ये विभागलेले आहे. हा नोटम कराची आणि लाहोर या दोन्ही हवाई क्षेत्रांना लागू आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode