जनगणनेतील धर्माच्या उल्लेखावर संघाच्या समन्वय बैठकीत चर्चा
लोकसंख्या असंतुलन, नशामुक्ती, युवक जागृतीसह पंच परिवर्तनावरही विचारमंथन विशाखापट्टणम, 20 ऑगस्ट (हिं.स.) : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय समन्वय बैठकीचा दुसरा दिवस गुरुवारी लोकसंख्या असंतुलनाच्या मुद्द्यावर केंद्रित राहिला. आंध्र प्रदेशात
संघाच्या विशाखापट्टनम येथील बैठकीचे छायाचित्र


लोकसंख्या असंतुलन, नशामुक्ती, युवक जागृतीसह पंच परिवर्तनावरही विचारमंथन

विशाखापट्टणम, 20 ऑगस्ट (हिं.स.) : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय समन्वय बैठकीचा दुसरा दिवस गुरुवारी लोकसंख्या असंतुलनाच्या मुद्द्यावर केंद्रित राहिला. आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम जिल्ह्यातील गुडीलोवा येथे सुरू असलेल्या तीन दिवसीय बैठकीत आगामी जनगणनेत धर्माचा उल्लेख आणि त्यातून देशातील लोकसंख्येच्या धार्मिक रचनेचे अचूक चित्र समोर आणण्याबाबत सविस्तर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

बैठकीच्या पहिल्या दिवशी, बुधवारी, संघ परिवारातील विविध संघटनांच्या वर्षभरातील कार्याचा आढावा घेण्यात आला. आगामी काळातील योजना, विविध उपक्रम तसेच सामाजिक विषयांवर परस्पर समन्वय साधण्याच्या दृष्टीनेही चर्चा झाली. याच वेळी देशातील विविध राज्यांमधील लोकसंख्येच्या रचनेत होत असलेले बदल, त्यामागील कारणे आणि त्याचे सामाजिक परिणाम यावर प्राथमिक स्वरूपात विचारमंथन करण्यात आले. गुरुवारी या विषयावर अधिक सविस्तर चर्चा करण्यात आली.विश्व हिंदू परिषदेच्या प्रतिनिधींसह संघ परिवारातील विविध संघटनांच्या प्रतिनिधींनी लोकसंख्येतील बदलांबाबतचे आपले अनुभव आणि निरीक्षणे बैठकीत मांडली. या चर्चेत लोकसंख्या असंतुलनाचा मुद्दा केंद्रस्थानी होता. बदलत्या लोकसंख्येच्या पार्श्वभूमीवर दीर्घकालीन राष्ट्रीय धोरणाच्या दृष्टीने कोणत्या उपाययोजना आवश्यक आहेत, यावरही विचार करण्यात आल्याचे समजते.

देशात फेब्रुवारी 2027 मध्ये जनगणना होणार असून त्यात सुमारे 40 प्रश्नांचा समावेश असण्याची शक्यता आहे. जनगणनेत नागरिकांच्या धर्मासंदर्भातील माहिती संकलित केल्यास देशातील विविध धर्मीयांची संख्या आणि लोकसंख्येतील त्यांचे प्रमाण याची अधिकृत व अचूक आकडेवारी उपलब्ध होण्यास मदत होईल, अशी भूमिका बैठकीत मांडण्यात आली.

धर्मांतरानंतरही अनेक व्यक्ती आपली पारंपरिक भारतीय नावे कायम ठेवतात. त्यामुळे केवळ नावावरून संबंधित व्यक्तीचा धर्मांतरित झाल्याचा अंदाज बांधणे शक्य होत नाही. अशा परिस्थितीत जनगणनेत धर्माची स्वतंत्र नोंद केल्यास देशातील धार्मिक लोकसंख्येचे अधिक स्पष्ट चित्र समोर येईल, असे मत काही प्रतिनिधींनी व्यक्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली. विश्व हिंदू परिषदेच्या प्रतिनिधींनी जनगणनेत धर्माची माहिती संकलित करण्याच्या निर्णयाचे स्वागत केले.

लोकसंख्या असंतुलनाबरोबरच बैठकीत नशामुक्ती, युवकांमध्ये सामाजिक जागृती, ‘पंच परिवर्तन’ आणि विकासाची भारतीय संकल्पना या विषयांवरही चर्चा झाल्याचे सूत्रांनी सांगितले.

‘यूएससीआयआरएफ’च्या भूमिकेवरही चर्चा

दरम्यान, अमेरिकेतील धार्मिक स्वातंत्र्याच्या प्रश्नांवर काम करणाऱ्या यूएस कमिशन ऑन इंटरनॅशनल रिलिजियस फ्रीडम (यूएससीआयआरएफ) या संस्थेने राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी घालण्याची मागणी केली आहे. तसेच संघाच्या नेत्यांना राजनैतिक सन्मान देऊ नये आणि त्यांच्यासोबत उच्चस्तरीय बैठका घेऊ नयेत, असे आवाहन अमेरिकन सरकारला करण्यात आल्याचे समोर आले आहे. सरसंघचालक 29 ऑगस्टपासून अमेरिका दौऱ्यावर जाणार असल्याच्या पार्श्वभूमीवर यूएससीआयआरएफच्या या भूमिकेवर प्रतिक्रिया द्यायची की नाही, याबाबत संघात चर्चा सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले. या विषयावर संघाची अधिकृत भूमिका बैठकीनंतर स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

-------------------------------------

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी


 rajesh pande