
मुंबई, 23 ऑगस्ट (हिं.स.)। संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या पावसाने पुन्हा एकदा महाराष्ट्राकडे मोर्चा वळवल्याचे चित्र आहे. बंगालच्या उपसागरात नव्याने कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता असल्याने राज्यातील काही भागांत पावसाला पोषक वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे पावसाच्या स्थितीत पुन्हा बदल होण्याची शक्यता असून अनेक भागांत पावसाच्या सरी कोसळण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, आज उत्तर महाराष्ट्रातील धुळे, जळगाव आणि नाशिक जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याची शक्यता आहे. तर विदर्भातील गोंदिया जिल्ह्यात सध्या जोरदार पावसाच्या सरी सुरू असून पुढील काही तास पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे गोंदिया जिल्ह्यासाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. राज्यातील उर्वरित भागांत काही ठिकाणी ढगाळ वातावरण राहण्यासह तुरळक ठिकाणी हलक्या सरींची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
दरम्यान, नागपूर जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. आज सकाळपासून नागपूरमध्ये ढगाळ वातावरण असून आज आणि उद्या विदर्भातील काही भागांत हलक्या पावसाची शक्यता आहे. मात्र, २६ ते २८ ऑगस्टदरम्यान विदर्भातील बहुतांश भागांत चांगला पाऊस होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण होणाऱ्या कमी दाबाच्या क्षेत्राचा परिणाम विदर्भातील पावसावर होण्याची शक्यता आहे.
गोंदिया जिल्ह्यात २२ ऑगस्टच्या रात्रीपासून पावसाची रिपरिप सुरू होती. आज सकाळपासून पावसाचा जोर वाढल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. हा पाऊस धान पिकासाठी फायदेशीर ठरणार असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. सततच्या पावसामुळे जिल्ह्यातील धरणांच्या पाणीसाठ्यातही वाढ होत आहे.
दरम्यान, यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांसमोरील संकट अद्याप कायम आहे. २९ आणि ३० जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे ५३५ गावांतील ४१ हजार ५५६ शेतकऱ्यांचे सुमारे ३६ हजार १३५ हेक्टर क्षेत्रावरील सोयाबीन, कापूस, तूर तसेच बागायती आणि बहुवार्षिक फळपिकांचे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे करून जिल्हा प्रशासनाने ३१ कोटी ५५ लाख रुपयांच्या मदतीचा प्रस्ताव शासनाकडे पाठवला आहे. आता ही मदत शेतकऱ्यांच्या खात्यात कधी जमा होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule