
मुंबई, 23 ऑगस्ट (हिं.स.)। मुंबईत गणेशोत्सवाच्या आगमनाची तयारी सुरू असतानाच दक्षिण मुंबईतील भुलेश्वर परिसरात शनिवारी रात्री भीषण दुर्घटना घडली. ‘भुलेश्वरचा राजा’ या गणेश मंडळाची सुमारे २२ फूट उंच गणेशमूर्ती आगमन मिरवणुकीदरम्यान अचानक कोसळल्याने दोन जणांचा मृत्यू झाला, तर पाच जण जखमी झाले. जखमींमध्ये दोन लहान मुलींचाही समावेश आहे. बाळाराम मर्चंट रोडवरील कबुतरखाना, जय अंबे चौक परिसरात मंडपापासून अवघ्या ५० फूट अंतरावर ही दुर्घटना घडली.
भायखळ्यातील अनिकेत देसाई यांच्या कार्यशाळेतून ही मूर्ती शनिवारी संध्याकाळी वाजतगाजत भुलेश्वरकडे रवाना झाली होती. भायखळा ते भुलेश्वरचा प्रवास सुरळीत पार पडल्यानंतर मंडपाजवळ पोहोचत असतानाच मूर्तीला आधार देणाऱ्या क्रेनचा तोल गेला आणि महाकाय मूर्ती अचानक खाली कोसळली. मूर्तीखाली काही जण अडकल्याने घटनास्थळी एकच गोंधळ उडाला.
या दुर्घटनेत मंडळाचे अध्यक्ष संकेत नेवशे (३३) आणि पदाधिकारी ब्रिजेश हेमंत जोशी (३०) यांचा मृत्यू झाला. वैभव घेनंद (३८) आणि पवन चौरसिया (२५) यांच्यावर जी. टी. रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. तर लावण्या गनेर (५), दिव्या गनेर (७) आणि कुणाल काशीद (२६) यांच्यावर जेजे रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या तिघांचीही प्रकृती स्थिर असल्याचे रुग्णालयीन अधिकाऱ्यांनी सांगितले.
घटनेची माहिती मिळताच मुंबई अग्निशमन दल, पोलीस, वाहतूक पोलीस, १०८ रुग्णवाहिका सेवा आणि बीएमसीच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य केले. डी. बी. मार्ग पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली असून दुर्घटनेच्या कारणांचा तपास सुरू आहे. प्राथमिकदृष्ट्या मूर्तीचा तोल गेल्याने दुर्घटना झाल्याचा अंदाज आहे. मात्र, मूर्तीच्या सांगाड्याचे वेल्डिंग तसेच याबाबतही चौकशी केली जाणार आहे. तर प्रत्यक्षदर्शीनी सांगितले की, पहिले गणपतीच्या गळ्यातील हार पडला. त्यानंतर मूर्ती हलायला झाली. खड्ड्यांमुळे सगळं झालं, अशी प्रतिक्रिया नागरिकांनी दिली. खड्ड्यात ट्रॉलिचं चाक अडकलं, त्यानंतर झटका बसला, अशी माहिती नागरिकांनी सांगितली.
दरम्यान, मुंबईतील वाढत्या उंचीच्या गणेशमूर्ती आणि पीओपीच्या वापराबाबत पुन्हा प्रश्न उपस्थित झाले आहेत. गणेशोत्सवाच्या तोंडावर घडलेल्या या दुर्घटनेमुळे उत्साहावर शोककळा पसरली असून, उंच मूर्तींच्या सुरक्षिततेबाबत प्रशासन आणि गणेश मंडळांवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule