

महापारेषण व केंद्रीय विद्युत प्राधिकरणाच्या संयुक्त कार्यशाळेत तज्ज्ञांचा सूर
पुणे, 23 ऑगस्ट (हिं.स.)। देशातील वीज व्यवस्थेची सुरक्षितता, विश्वासार्हता आणि कार्यक्षमता वाढविण्यासाठी केंद्रीय विद्युत प्राधिकरणाच्या नियम व तांत्रिक मानकांची प्रभावी अंमलबजावणी करणे अत्यावश्यक असल्याचे मत वीज क्षेत्रातील मान्यवरांनी व्यक्त केले. केंद्रीय विद्युत प्राधिकरण, भारत सरकारच्या ऊर्जा मंत्रालय आणि महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित (महापारेषण) यांच्या संयुक्त विद्यमाने पुण्यात केंद्रीय विद्युत प्राधिकरण नियम व तांत्रिक मानकांवरील प्रादेशिक स्तरावरील एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत पश्चिम विभागातील विविध राज्यांतील वीज कंपन्या, सार्वजनिक व खासगी क्षेत्रातील वीज उपक्रम, तज्ज्ञ आणि अधिकारी अशा सुमारे दीडशे प्रतिनिधींनी सहभाग घेतला.
कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी केंद्रीय विद्युत प्राधिकरणाचे सदस्य (थर्मल), सदस्य (ई अँड सी) व भारत सरकारचे पदसिद्ध अतिरिक्त सचिव प्रवीण गुप्ता हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. महापारेषणचे संचालक (संचलन) सतीश चव्हाण आणि संचालक (प्रकल्प) दत्तात्रय पडळकर हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते. तसेच केंद्रीय विद्युत प्राधिकरणाचे मुख्य अभियंता (नियामक व्यवहार) एल. के. एस. राठोड यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
प्रवीण गुप्ता यांनी केंद्रीय विद्युत प्राधिकरण नियमांचा मुख्य उद्देश भारतीय वीज ग्रिडची सुरक्षितता, विश्वासार्हता आणि कार्यक्षमता सुनिश्चित करणे हा असल्याचे सांगितले. या कार्यशाळेचा उपयोग वीज क्षेत्रातील अधिकारी व अभियंत्यांनी नियमांची सखोल माहिती करून घेण्यासाठी करावा, असे आवाहन त्यांनी केले.
महापारेषणचे संचालक (संचलन) सतीश चव्हाण यांनी महापारेषणच्या पारेषण व्यवस्थेची माहिती देताना नवीकरणीय ऊर्जा ग्रिडमध्ये समाविष्ट करण्यासाठी पारेषण जाळ्याचा सातत्याने विकास करण्यात येत असल्याचे सांगितले. संचालक (प्रकल्प) दत्तात्रय पडळकर यांनी महाराष्ट्रातील सुरू असलेल्या पारेषण प्रकल्पांची माहिती देत, प्रकल्पांची प्रभावी अंमलबजावणी आणि ग्रिडचे सुरळीत संचलन यासाठी केंद्रीय विद्युत प्राधिकरण नियमांचे महत्त्व अधोरेखित केले. एल. के. एस. राठोड यांनी ग्रिडची सुरक्षितता, विश्वासार्हता आणि नवीकरणीय ऊर्जेचे एकत्रीकरण यासाठी केंद्रीय विद्युत प्राधिकरण तांत्रिक मानकांची सक्रिय अंमलबजावणी आवश्यक असल्याचे सांगितले.
कार्यशाळेतील तांत्रिक सत्रांमध्ये विद्युत वाहिन्या व उपकेंद्रांच्या बांधकामासंबंधी तांत्रिक मानके, विद्युत सुरक्षितता व पुरवठा नियम 2023, ग्रिड कनेक्टिव्हिटी मानके, ग्रीड स्टँडर्ड्स 2010, वितरित ऊर्जा स्त्रोतांच्या जोडणीसंबंधी मानके, प्रस्तावित कनेक्टिव्हिटी नियम 2026 तसेच वीज क्षेत्रातील सायबर सुरक्षा नियम 2026 यावर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाच्या शेवटी प्रश्नोत्तर व अभिप्राय सत्र घेण्यात आले. केंद्रीय विद्युत प्राधिकरणाचे उपसंचालक संदीप कुमार यांनी आभार प्रदर्शन करून कार्यशाळेची सांगता केली. या उपक्रमामुळे वीज क्षेत्रातील विविध भागधारकांमध्ये केंद्रीय विद्युत प्राधिकरण नियम व तांत्रिक मानकांविषयीची जागरूकता अधिक दृढ होईल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule