
लातूर, 23 ऑगस्ट (हिं.स.)।
औसा येथील जिल्हा परिषद शाळेच्या प्रकरणाने आता गंभीर वळण घेतले आहे. शाळेला अभिजीत दिपके यांनी भेट दिल्यानंतर खासगी शाळेतील विद्यार्थी थेट जिल्हा परिषद शाळेत कसे आणि का आले? हा सवाल उपस्थित होत असतानाच या प्रकरणात नवा धक्कादायक ट्विस्ट समोर आला आहे.
शिक्षकांना धमकी देणे आणि शाळेची बदनामी केल्याप्रकरणी अभिजीत दिपकेसह त्यांच्या सहकाऱ्यांविरोधात औसा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे औसा परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
या घटनेमुळे जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांमध्येही चर्चेला उधाण आले असून, नेमके काय घडले, कोणत्या कारणातून शिक्षकांना धमकी देण्यात आली आणि शाळेची बदनामी करण्यामागे नेमका उद्देश काय होता, याबाबत आता प्रश्न उपस्थित होत आहेत.
दरम्यान, खासगी शाळेतून विद्यार्थी जिल्हा परिषद शाळेकडे वळण्यामागील कारणे आणि अभिजीत दिपके यांच्या भेटीनंतर घडलेल्या घटनांचीही चर्चा सुरू आहे. त्यामुळे हे प्रकरण केवळ शाळेपुरते मर्यादित न राहता शिक्षण क्षेत्रातही चर्चेचा विषय बनले आहे.
शिक्षकांना धमकी आणि शाळेची बदनामी केल्याचा आरोप कितपत खरा? या संपूर्ण प्रकरणामागे नेमके काय दडले आहे? याचा उलगडा आता पोलिस तपासातून होणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis