
नवी दिल्ली , 23 ऑगस्ट (हिं.स.)।ओमानमधून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. ओमानच्या सुलतान सईद बिन तैमूर स्ट्रीटवर भारतीय नागरिकांना घेऊन जाणारे एक वाहन अनियंत्रित होऊन अपघातग्रस्त झाले. या दुर्घटनेत एका भारतीय नागरिकाचा मृत्यू झाला असून, अन्य ९ भारतीय नागरिक जखमी झाल्याची माहिती आहे.
स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाहनात काही बिघाड झाल्याने ते चालकाच्या नियंत्रणाबाहेर गेले आणि रस्त्यावरून खाली उतरले. त्यानंतर हा अपघात झाला. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
पोलिसांनी सांगितले की, ओमानमध्ये एका वाहनाने रस्ता सोडल्यानंतर झालेल्या अपघातात एका भारतीय नागरिकाचा मृत्यू झाला, तर अन्य नऊ जण जखमी झाले. ही घटना शनिवारी सुलतान सईद बिन तैमूर स्ट्रीटवर घडली. वाहन रस्त्यावरून घसरून दुसऱ्या बाजूला गेल्यानंतर हा अपघात झाला.
रॉयल ओमान पोलिसांनी ‘एक्स’वर केलेल्या पोस्टमध्ये सांगितले की, पोलिसांच्या हवाई पथकाने अल हेमा गव्हर्नरेटमधून दोन जखमींना निझवा रुग्णालयात पोहोचवण्यासाठी बचाव मोहीम राबवली.पोस्टमध्ये म्हटले आहे की, या दुर्घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून, भारतीय वंशाचे नऊ जण जखमी झाले आहेत. त्यानंतर सर्व जखमींना उपचारासाठी रुग्णवाहिकेतून निझवा रुग्णालयात नेण्यात आले.
अपघात नेमका कशामुळे झाला, याबाबत पोलिसांनी अधिक माहिती दिलेली नाही. दरम्यान, यापूर्वी दिलेल्या वृत्तानुसार, वादळी वारे, मुसळधार पाऊस आणि उडणाऱ्या धुळीमुळे महामार्गावरील दृश्यता कमी होण्याचा इशारा अधिकाऱ्यांनी दिला होता.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode