
मुंबई, 24 ऑगस्ट (हिं.स.)। महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून पावसाने काहीशी विश्रांती घेतल्याचे चित्र असताना आता पुन्हा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरातील हवामान प्रणाली सक्रिय झाल्याने राज्यातील काही भागांत मुसळधार, तर काही ठिकाणी वादळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. विशेषतः घाटमाथा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये जोरदार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता असून, 25 ऑगस्टपर्यंत पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकरी आणि नागरिकांनी स्थानिक हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन आवश्यक काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
पावसाळा सुरू होऊन अडीच महिन्यांचा कालावधी उलटत आला असतानाही राज्यातील अनेक भागांत अपेक्षित पाऊस झालेला नाही. विशेषतः मराठवाड्यातील अनेक भाग अद्याप दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे खरीप पिकांसह पिण्याचे पाणी, जनावरांसाठी पाणी आणि चाऱ्याचा प्रश्न निर्माण होण्याची चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे. अशा परिस्थितीत पुढील काही दिवसांत होणारा पाऊस राज्यातील शेतीसाठी महत्त्वाचा ठरणार आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, आज 24 ऑगस्ट रोजी महाराष्ट्रातील घाटमाथ्यासह विदर्भात दमदार पावसाची शक्यता आहे. पुणे आणि सातारा जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर जोरदार सरी कोसळण्याची शक्यता असून काही जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. मराठवाडा तसेच पूर्व विदर्भातील काही भागांत विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याचा अंदाज आहे. उत्तर महाराष्ट्रातही पावसाच्या सरींची शक्यता असून राज्यातील उर्वरित भागात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
कोकण-गोवा परिसरात बहुतांश ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आहे. दक्षिण मध्य महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो, तर उत्तर मध्य महाराष्ट्रातील काही भागांतही पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यात काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस, तसेच मेघगर्जनेसह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. पुढील दोन दिवसांत कोकण-गोवा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील काही भागांत इतर प्रदेशांच्या तुलनेत पावसाचा जोर अधिक राहण्याची शक्यता आहे.
दरम्यान, भंडारा जिल्ह्यातील गोसेखुर्द धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू असल्याने धरणाच्या विसर्गात वाढ करण्यात आली आहे. पुजारीटोला आणि धापेवाडा धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी वैनगंगा नदीत सोडले जात आहे. त्यामुळे नदीची पाणीपातळी वाढली असून गोसेखुर्द धरणातील जलसाठ्यातही झपाट्याने वाढ होत आहे. जलसाठा नियंत्रित ठेवण्यासाठी धरणाचे 23 दरवाजे अर्धा मीटरने उघडण्यात आले असून त्यातून 96 हजार 417 क्युसेक प्रतिसेकंद वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. दुपारच्या तुलनेत विसर्गात 15 हजार 911 क्युसेकने वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहण्याची गरज आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule