
वसतिगृहाच्या वयोमर्यादा, असुरक्षित सुविधा आणि नियमांबाबत तोडगा काढण्याची मागणी
मुंबई,24 ऑगस्ट (हिं.स.) : काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सोमवारी रात्री महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून राज्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या विविध समस्यांकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी केली.
महाराष्ट्रातील विविध भागांतील आदिवासी विद्यार्थी सरकारी वसतिगृहांमध्ये राहण्यासाठी लागू करण्यात आलेल्या वयोमर्यादेसह कथित अपमानास्पद आणि असुरक्षित नियमांविरोधात दहा दिवसांहून अधिक काळ उपोषण करत असल्याचे राहुल गांधी यांनी सांगितले. राहुल गांधी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आंदोलन करणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांच्या समस्या जाणून घ्याव्यात आणि त्यावर लवकरात लवकर तोडगा काढावा, अशी मागणी केली आहे. सरकारी वसतिगृहात राहण्यासाठी लागू असलेली 30 वर्षांची वयोमर्यादा शिथिल करण्याची मागणीही त्यांनी केली.
राहुल गांधी यांनी ‘एक्स’वरील पोस्टमध्ये म्हटले की, महाराष्ट्रातील अनेक आदिवासी विद्यार्थी आपल्या हक्कांसाठी दहा दिवसांहून अधिक काळ उपोषण करत आहेत. पुण्यात आयोजित ‘विद्यार्थ्यांची गूंज’ कार्यक्रमादरम्यान विद्यार्थिनींनी वसतिगृहातील 30 वर्षांची वयोमर्यादा, कथित अपमानास्पद नियम, असुरक्षित सुविधा आणि महिलांच्या गर्भधारणेच्या तपासणीसारख्या कथित अमानवीय व्यवस्थांबाबत आपली व्यथा मांडल्याचे त्यांनी सांगितले.या पोस्टसोबत राहुल गांधी यांनी विद्यार्थ्यांचे निवेदन तसेच मुख्यमंत्री फडणवीस यांना लिहिलेले पत्रही शेअर केले आहे. हे विद्यार्थी दुर्गम गावांमधून आणि छोट्या शहरांमधून येतात. ते सरकारकडे कोणतीही देणगी मागत नसून, आपला हक्क मागत आहेत, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.
पत्रात राहुल गांधी म्हणाले की, आदिवासी विद्यार्थी शिक्षणासाठी शहरांमध्ये आल्यानंतर सरकारी वसतिगृहांवर मोठ्या प्रमाणात अवलंबून असतात. मात्र, नव्या नियमांनुसार 30 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या विद्यार्थ्यांना वसतिगृहात राहता येत नाही. त्यामुळे शिक्षण पूर्ण करणारे किंवा परीक्षांची तयारी करणारे अनेक विद्यार्थी वसतिगृहाच्या सुविधेपासून वंचित होत असल्याचा दावा त्यांनी केला.वसतिगृहांमधील सुरक्षा, भोजन, स्वच्छता आणि वैद्यकीय सुविधांबाबतही राहुल गांधी यांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले. विद्यार्थ्यांना दुखापत होण्याच्या घटना घडल्याचा तसेच सर्पदंशामुळे मृत्यू झाल्याचाही त्यांनी दावा केला. विद्यार्थिनींसाठी परिस्थिती आणखी गंभीर असल्याचेही त्यांनी नमूद केले.
दीर्घकाळ वसतिगृहाबाहेर राहिल्यानंतर परतणाऱ्या विद्यार्थिनींना ‘फिटनेस’ सिद्ध करण्यासाठी गर्भधारणेची तपासणी आणि इतर वैद्यकीय तपासण्यांना सामोरे जावे लागत असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला. हा प्रकार अपमानास्पद असून विद्यार्थिनींच्या प्रतिष्ठेला आणि मानवी सन्मानाला धक्का पोहोचवणारा असल्याचे त्यांनी पत्रात म्हटले आहे.सरकारचे लक्ष वेधण्यासाठी विद्यार्थ्यांना आपल्या आरोग्याचा धोका पत्करावा लागू नये, असे राहुल गांधी यांनी म्हटले. आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मागण्यांकडे संवेदनशीलतेने पाहून त्यांचे प्रश्न तातडीने सोडवावेत, अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे केली आहे.
----------------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी