मोदी सरकारची अंतराळ कार्यक्रमाच्या खाजगीकरणाच्या दिशेने वाटचाल - जयराम रमेश
नवी दिल्ली, 24 ऑगस्ट (हिं.स.)। काँग्रेस महासचिव जयराम रमेश यांनी भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो)च्या भविष्यातील भूमिकेबाबत केंद्र सरकारवर अंतराळ कार्यक्रमाच्या आक्रमक खाजगीकरणाच्या दिशेने पुढे जाण्याचा आरोप केला आहे. त्यांनी म्हटले आहे की, इस्र
Jairam Ramesh


नवी दिल्ली, 24 ऑगस्ट (हिं.स.)। काँग्रेस महासचिव जयराम रमेश यांनी भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो)च्या भविष्यातील भूमिकेबाबत केंद्र सरकारवर अंतराळ कार्यक्रमाच्या आक्रमक खाजगीकरणाच्या दिशेने पुढे जाण्याचा आरोप केला आहे. त्यांनी म्हटले आहे की, इस्रोची रॉकेट विकास आणि निर्मितीमधील भूमिका मर्यादित करण्याची तसेच त्याच्या अनेक उपग्रह-संबंधित संसाधनांचे खाजगी कंपन्यांकडे हस्तांतरण करण्याची तयारी केली जात आहे.

जयराम रमेश यांनी सोमवारी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर म्हटले की, गेल्या काही दिवसांत देशाच्या अंतराळ कार्यक्रमातील इस्रोच्या भविष्यातील भूमिकेबाबत समोर आलेल्या बातम्यांमुळे गंभीर आणि रास्त चिंता निर्माण झाल्या आहेत. इस्रोने गेल्या सहा दशकांत वैज्ञानिक आणि तंत्रज्ञांच्या अथक प्रयत्नांतून आपली क्षमता आणि तज्ज्ञता विकसित केली आहे.

काँग्रेस महासचिवांनी म्हटले की, अणुऊर्जेप्रमाणेच मोदी सरकार अंतराळ कार्यक्रमाच्या क्षेत्रातही आक्रमक खाजगीकरणाच्या अजेंड्यावर पुढे जात आहे. या दिशेने पंतप्रधान आणि पंतप्रधान कार्यालयाकडूनच पुढाकार घेतला जात असल्याचा त्यांनी दावा केला. त्यांनी आरोप केला की, रॉकेट विकास आणि निर्मितीमध्ये इस्रोची उपस्थिती मोठ्या प्रमाणात मर्यादित केली जात आहे आणि त्याच्या अनेक उपग्रह-संबंधित संसाधनांचे खाजगी कंपन्यांकडे हस्तांतरण करण्याची तयारी सुरू आहे. त्यांनी तमिळनाडूमध्ये उभारण्यात येत असलेल्या दुसऱ्या अंतराळ केंद्राचाही उल्लेख केला आणि म्हटले की, या प्रकल्पावर इस्रो सुमारे एक हजार कोटी रुपये खर्च करत आहे, मात्र हे केंद्रही एखाद्या खासगी कंपनीकडे सोपवण्याची चर्चा समोर येत आहे.

काँग्रेस महासचिवांनी म्हटले की, या बदलांदरम्यान आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथील ऐतिहासिक अंतराळ केंद्राच्या भवितव्याबाबतही प्रश्न उपस्थित होत आहेत. जयराम रमेश यांनी म्हटले की, इस्रोने देशाला अभिमान वाटावा अशी कामगिरी केली आहे आणि पंतप्रधानांनी स्वतः अनेक प्रसंगी त्याच्या उपलब्धींचे श्रेय घेतले आहे. अंतराळ क्षेत्रात काम करणाऱ्या स्टार्टअप्सना प्रोत्साहन आणि पाठबळ मिळाले पाहिजे, मात्र प्रश्न असा आहे की, दीर्घकाळापासून खाजगी क्षेत्रासोबत उत्पादक भागीदारी करणाऱ्या इस्रोला कमकुवत करण्याची गरज का भासत आहे. त्यांनी दावा केला की, गेल्या काही महिन्यांत इस्रोमधील सुमारे १०० ते १२० महत्त्वपूर्ण व्यावसायिकांनी संस्था सोडली आहे. कदाचित या लोकांना आगामी बदलांचा अंदाज आला असावा.

त्यांनी म्हटले की, इस्रोचे एक माजी अध्यक्ष, जे पंतप्रधानांपासून प्रभावित होऊन ऑक्टोबर २०१८ मध्ये भाजपमध्ये सहभागी झाले होते, त्यांनीही इस्रोशी संबंधित नव्या खाजगीकरणाच्या मोहिमेबाबत गंभीर चिंता व्यक्त केली आहे. इस्रोचे इतर पाच हयात प्रतिष्ठित माजी अध्यक्षही या महत्त्वाच्या मुद्द्यावर आपली भूमिका का मांडत नाहीत, असा सवाल त्यांनी केला. काँग्रेस महासचिव जयराम रमेश यांनी म्हटले की, अंतराळ कार्यक्रमात खाजगी क्षेत्राच्या सहभागाला त्यांचा विरोध नाही, मात्र इस्रोची संस्थात्मक क्षमता, तज्ज्ञता आणि देशाच्या अंतराळ कार्यक्रमातील त्याची केंद्रीय भूमिका कमकुवत केली जात असल्यास त्यावर प्रश्न उपस्थित होणे स्वाभाविक आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande