
पुण्यातल्या कार्यक्रमात राहुल गांधी यांनी मनुस्मृतीचा मनाला वाटेल तसा अर्थ सांगून मनुस्मृति ग्रंथाबद्दल अपसमज अधिक दृढ करण्याचा प्रयत्न केला. वास्तविक मनुस्मृती या ग्रंथाला स्थल, काल याचे कोणतेही बंधन नाही; असे जगातील विद्वानांचे म्हणणे आहे. जगातल्या अधिकाधिक देशांनी मनुस्मृती या ग्रंथाला आदर्श आणि मार्गदर्शनपर ग्रंथ म्हणून स्वीकारले आहे. ते साधार स्पष्ट करण्यासाठी हा लेख प्रपंच !
मनुस्मृति हा भारतातील सर्वात महत्त्वाचा ग्रंथ. माणसाने सामाजिक जीवनात कसे वागावे कोणते बंधन पाळावे याबाबत मार्गदर्शन करणारा हा जगातला पहिला ग्रंथ असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. थोडक्यात हा न्यायशास्त्र आणि नीतीशास्त्रावरचा ग्रंथ आहे. आज आपल्या देशात मनुस्मृती या ग्रंथ उपेक्षिला जात असला तरी सुद्धा तो उपेक्षित ग्रंथ नाही. तसेच तो वर्णव्यवस्था मान्य करणारा ग्रंथ असला तरी चार वर्णां मधील कोणत्याही वर्णावर अन्याय करणारा हा ग्रंथ नाही.
या ग्रंथाबाबत असा एक अपसमज पसरवण्यात आला आहे आणि तो म्हणजे चातुर्वर्णात ब्राह्मणाला सगळ्यात जास्त सुखसोयी उपलब्ध करून दिल्या आहेत.
मनुस्मृती सांगते... एकच किंवा सारखा अपराध ब्राह्मणाने किंवा शूद्राने केला तर ब्राह्मणाला शूद्र पेक्षा चौसष्ट पट किंवा एकशे अठ्ठावीस पट अशी शिक्षा सांगितली आहे. जो ब्राह्मण, ब्राह्मण धर्माने राहत नसेल केवळ जातीने ब्राह्मण असेल तर त्याला मान देण्याची काहीही आवश्यकता नाही. महाभारताने अशा ब्राह्मणाच्या संदर्भात तान् सर्वान् धार्मिको राजा बलिं विष्टीं च कारयेत् असा स्वच्छ आदेश दिला आहे. जे ब्राह्मणाचे नियम पाळत नाहीत, केवळ जातीने ब्राह्मण आहेत त्यांच्याकडून धार्मिक राजाने योग्य तो कर घ्यावा आणि त्याला वेठीला जुंपावे. प्रसंगाविशेषी अशा केवळ जन्मानेच ब्राह्मण असलेल्याला मृत्युदंड सुद्धा द्यावा, असे महाभारताचे वचन आहे. आततायी ब्राह्मणाला तो चांगला विद्वान असला तरी ठार मारावे असेच मनू म्हणतो. आता वैश्य शूद्रापेक्षा केवळ जन्माने ब्राह्मण असणाऱ्याचे कोणते वैशिष्ट्य राहिले? (संदर्भ-श्रीमनुस्मृति सार्थ स्वभाष्य, संपादक-स्वामी वरदानंद भारती, पृष्ठ २३)
जगाकडे दृष्टिक्षेप टाकला तर आपल्या असे लक्षात येते की जगातल्या अनेक देशांनी न्यायशास्त्राची मूलतत्त्वे मनुस्मृती मधून उसनी घेतली आहे. आपल्या देशात मात्र मनुस्मृतीची अवहेलना झाली. असो.
ब्रिटनमध्ये स्थायिक झालेले पण वेद, बायबल आणि कुराण या तिन्हीचे पंडित म्हणून ओळखले जाणारे पाकिस्तानी मुसलमान डॉ. अन्वर शेख हे लिबर्टी नावाचे इंग्रजी मासिक चालवत होते. त्या मासिकात वैदिक समाज नियमावर दिलेल्या एका विस्तृत लेखात त्यांनी मनुस्मृतीची न्यायदानाच्या क्षेत्रातील आश्चर्यकारक उत्तुंगता दाखवली आहे. त्यांनी असा निर्वाळा दिला की मनूने घालून दिलेले नियम अत्यंत प्रगल्भ संस्कृतीच्या देशातच होणे शक्य आहे. ते म्हणतात मनूचे काही नियम तर बहुतेक सर्व आधुनिक कायदेशास्त्राच्या कितीतरी पुढे आहेत.
दुसऱ्या एका इंडियन इन युरोप शीर्षकाचा लेखक डाॅ. अन्वर शेख यांनी लिहिला या लेखात ते लिहितात.. .आर्य जेव्हा वैदिक मातृभूमी असलेल्या पंजाब मधून निघून युरोपीय देशात पोहोचले तेव्हा त्यांनी वैदिक तत्त्वज्ञानाबरोबर मनूचे कायदे नेले. तेच पाश्चिमात्य संस्कृतीत विकसित झाले.
याचे उदाहरण देताना त्यांनी मनुस्मृति मधल्या समानतेच्या कायद्याचा निर्देश केला. या नियमानुसार एखाद्या माणसावरील खटला तो माणूस ज्या सामाजिक स्तरातला असेल त्याच स्तराच्या व्यक्तींना चालवण्याचा अधिकार आहे.
चौदाव्या शतकात इंग्लिश पार्लमेंट मध्ये अनेक वेळा त्या तत्त्वाचा आधार घेऊन निर्णय दिले गेले. एका राजाला त्यांनी या तत्वाच्या बळावर पदच्युत केले.
दुसऱ्या एका तत्त्वाचा शेख यांनी निर्देश केला. ते ग्रीस आणि रोममध्ये सर्रास अंमलात आणले जात होते. या दोन्ही समाजातले संमिश्र विवाहाचे कायदे मनुस्मृती सारखे आहेत. अशा संबंधातून निर्माण झालेल्या संततीचे कायदेशीर हक्कही वैदिक समाजातल्या नितीनियमान सारखेच होते.
कोणत्या विशेष परिस्थितीत एखाद्या विधवेने आपल्या दिराशी लग्न करावे हे मनुस्मृतित सांगितले आहे. त्याचाही डाॅ. अन्वर शेख यांनी उल्लेख केला. मध्यपूर्वेची संस्कृती आणि युरोपातील सुधारणा युग या दोन्हीत या वैदिक कायद्याचे स्पष्ट अनुकरण दिसते.
ब्रह्मदेशातील कायदा विषयक ग्रंथांनी मनुस्मृतीतून भरपूर उसनवार केली आहे. श्रीलंकेच्या उलोवंश ग्रंथात मनुस्मृतीने घालून दिलेल्या राजधर्माचा वारंवार उल्लेख केला आहे. इंडोनेशियातील कायदेविषयक ग्रंथ ही मनुस्मृतीवर आधारलेले दिसतात. लंडनमधील ब्रिटिश संग्रहालयाचे एक अधिकारी बज यांनी म्हटले की चीनमध्ये सापडलेल्या एका हस्तलिखितात त्यांना मनूच्या नीतिननियमांचा स्पष्ट उल्लेख आढळला. जावा मधील कायदा विषयक साहित्यात मनुस्मृतीचा बराच प्रभाव दिसतो.
सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे
फिलिपाईन्स मध्ये मॅनिला येथे तिथल्या विधानभवनासमोर मनूचा पुतळा उभा करण्यात आला आहे.
आपल्या देशाचे संविधान जगातल्या इंग्लंड, अमेरिका, आयर्लंड, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, रशिया, जपान, जर्मनी, आफ्रिका आणि फ्रान्स या दहा देशांच्या संविधानाचा अभ्यास करून निर्माण करण्यात आली आहे. या दहा देशांनी त्यांचे संविधान निर्माण करताना वेद, उपनिषदे, महाभारत, रामायण आणि मनुस्मृती या ग्रंथांचा आधार घेतला होता. आज आपल्या देशात श्रीराम आणि श्रीकृष्ण हे काल्पनिक असल्याचे सांगितले जाते. मनुस्मृति विषयी तर सातत्याने संताप व्यक्त केला जातो.
जर्मन दर्शनिक नित्से बायबलची तुलना मनुस्मृतीशी करणे हा मनुस्मृतीचा अपमान आहे असे सांगतात. अमेरिकेचा एन्सायक्लोपीडिया ऑफ सोशल सायन्स आणि केंब्रिजच्या हिस्टरी ऑफ इंडिया या ग्रंथांनी मनुस्मृतिचा गौरव केला आहे.
भारतीय वेद आणि अन्य ग्रंथ जातीभेद मानतात असे सांगितले जाते. हे विधान कसे असत्य आहे ते मनुस्मृतितील पुढचा श्लोक सिद्ध करण्यास पुरेसा आहे. तो श्लोक असा..
जन्मना जायते शूद्र: संस्काराद् द्विज उच्चते ।
वेदपाठाद् भवेद् विप्र: ब्रह्म जानाति ब्राह्मण: ॥
आशय- जन्माला आलेला प्रत्येक माणूस हा शूद्र याचा अर्थ अज्ञानी म्हणजेच प्राथमिक अवस्थेत असतो संस्कारामुळे त्याचा दुसरा जन्म होतो. म्हणजेच त्याचे अज्ञान दूर होऊन तो ज्ञानी होतो. हे ज्ञान म्हणजे वेदांचे पठण होय. वेदांचा अभ्यास केल्यामुळे माणूस विप्र म्हणजे विद्वान होतो. अशाप्रकारे वेदांचे अध्ययन केल्यावर अध्ययन करणाऱ्याला परमज्ञान प्राप्त होते म्हणजेच ब्रह्मज्ञान प्राप्त होते. असे परमज्ञान प्राप्त झालेल्या माणसाला किंवा विद्वानाला ब्राह्मण असे म्हणतात.
महिलांना दुय्यम स्थान आणि पुरुषांना श्रेष्ठता देणारा ग्रंथ म्हणजे मनुस्मृति असे सांगितले जाते तेही सत्य नाही. मनुस्मृति ग्रंथातला अध्याय ३ रा श्लोक ५६ ते ५९ हे चार श्लोक स्त्रियांची महती सांगणारे आहेत.
यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता ।
यत्रैवास्तु न पूज्यन्ते सर्वास्तत्राफला: क्रिया: ॥५६॥
शोचन्ति जामोद यत्र विनश्यत्याशु तत्कुलम्।
न शोचन्ति तु यत्रैता वर्धते तद्धि सर्वदा ॥५७॥
जामयो यानि गेहानि शपन्त्यप्रतिपूजित: ।
तानि कृत्याहतानीव विनश्यन्ति समन्तत: ॥५८॥
तस्मादेता: सदा पूज्या भूषणाच्छादनाशनै: ।
भूतिकामैर्नरैरनित्यं सत्कारेषूत्सवेषु च ॥५९॥
आशय - जेथे स्त्रियांचे सर्वार्थाने पूजन होते. तेथेच देवतागण संतोषाने आणि प्रसन्नतेने वास करतात. ज्या घरात स्त्रियांची अवहेलना होते तेथील सर्वधर्मकृत्ये निष्फळ ठरतात.
ज्या घरात पत्नी, कन्या, सून यांच्यावर अन्याय केला जातो त्यामुळे त्यांच्यावर शोक करण्याचा प्रसंग येतो. असे कुळ नाश पावते. या उलट जेथे स्त्रियांचा छळ होत नाही त्या कुळाची भरभराट होते.
ज्या घरात स्त्रियांचा छळ केला जातो. त्या स्त्रियांचा तळतळाटामुळे गृहभूतपिशाच इत्यादींची बाधा त्या कुळाला होऊन त्या कुळाचा सर्वनाश होतो.
ज्या पुरुषाला आपल्या परिवाराचे कल्याण व्हावे असे वाटते, त्याने नेहमीच कुलस्त्रियांना आदराने वागवावे. अलंकार, वस्त्रे आणि चांगले खाद्यपदार्थ यांनी त्यांचे पूजन करावे, वाणीने त्यांचे कौतुक करावे, उत्सवाच्या विशेष प्रसंगी यांचा सन्मान करावा.
मनू महाराजांनी निर्माण केलेले काही नियम हे तात्कालिक आहेत तर काही नियम सर्वकालिका आहेत. ही गोष्ट प्रामुख्याने लक्षात घ्यावी लागते. तात्कालीक नियम हे त्या विशिष्ट काळापुरतेच मर्यादित असतात ते कायमस्वरूपी पाळले जात नाहीत. त्यामुळे काही नियम हे बंधनकारक आणि जाचक वाटले तर ते त्या तेवढ्या काळापुरतेच आहेत ते कायमस्वरूपी नाहीत, ही गोष्ट दृष्टिआड करता येत नाही. अशा काही तात्कालीक नियमांमध्ये न स्त्री स्वातंत्र्यमर्हति स्त्रियांवर बंधन घालणारा हा श्लोक आहे. समाजातली परिस्थिती काही कारणामुळे शांतता आणि सुव्यवस्थेला बाधा आणणारी झाली असेल अशा परिस्थितीत स्त्रियांना बाहेर जाण्याचे कोणतेही स्वातंत्र्य देऊ नये. अशा वेळेस स्त्रियांचा जीव आणि स्त्रियांचे शील धोक्यात येऊ शकते. म्हणून अशा परिस्थितीत स्त्रिया स्वतंत्र नाहीत असे म्हटले आहे.
भारतीय संस्कृती ही केवळ धर्मापुरतीच मर्यादित नसून ती मानवी जीवनाच्या सर्व अंगांना स्पर्श करणारी आहे. मानवी जीवन अधिकाधिक उन्नत आणि सुखी व्हावे यासाठी झटणारी आहे. तसेच भूगर्भशास्त्रापासून ते खगोलशास्त्रपर्यंतच्या सर्व ज्ञानाच्या क्षेत्रात स्वैरपणे संचार करणारी भारतीय संस्कृती आहे. त्यामुळे ती कोणत्याही मानवी समाजासाठी उपयुक्त ठरणारी असून समाजाचा न्यायनीतीच्या पायावर उभा असलेला राष्ट्रवाद टिकवून ठेवण्यास सहाय्यभूत ठरणारी आहे. राक्षसी प्रवृत्तीला भारतीय संस्कृतीने कोठेही थारा दिला नाही. उलट अशी राक्षसी प्रवृत्ती समूळ नष्ट केली पाहिजे तरच सभ्य, सुविद्य आणि सुसंस्कृत समाज सुखासमाधानाने जगू शकेल. असे भारतीय संस्कृती स्पष्टपणे सांगते. म्हणूनच भारतीय संस्कृतीच्या पदपथावरून वाटचाल करणारे जगातले अनेक देश आढळतात. याचे भानही ठेवणे आवश्यक आहे.
- दुर्गेश जयवंत परुळकर
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी