नागपूर : जलशुद्धीकरण प्रकल्पात क्लोरीन वायूची गळती; 40 जण रुग्णालयात दाखल
सुमारे 200 मीटरचा परिसर ‘नो-मॅन्स लँड’ घोषित एकूण 90 टक्के गळतीवर नियंत्रण नागपूर, 24 ऑगस्ट (हिं.स.) : नागपूरच्या गोधनी परिसरातील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या (एमजेपी) जलशुद्धीकरण प्रकल्पात मध्यरात्रीच्या सुमारास क्लोरीन वायूची गळती झाल्याने
नागपूरच्या जलशुद्धीकरण प्रकल्पात क्लोरीन वायूची गळती


सुमारे 200 मीटरचा परिसर ‘नो-मॅन्स लँड’ घोषित

एकूण 90 टक्के गळतीवर नियंत्रण

नागपूर, 24 ऑगस्ट (हिं.स.) : नागपूरच्या गोधनी परिसरातील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या (एमजेपी) जलशुद्धीकरण प्रकल्पात मध्यरात्रीच्या सुमारास क्लोरीन वायूची गळती झाल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि आपत्कालीन पथके तातडीने घटनास्थळी दाखल झाली आणि मोठ्या प्रमाणावर बचावकार्य सुरू करण्यात आले.

मानकापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हरेश कलशेकर यांच्या माहितीनुसार, हा जलशुद्धीकरण प्रकल्प गोधनी नगरपंचायतीच्या हद्दीत येतो. रात्री सुमारे 12.45 वाजता प्रशासनाला क्लोरीन वायू गळतीची माहिती मिळाली. त्यानंतर पोलीस प्रशासन आणि आपत्कालीन यंत्रणांनी कोणताही विलंब न करता घटनास्थळी धाव घेतली आणि मदत व बचावकार्य सुरू केले. क्लोरीन वायूचा धोका लक्षात घेता प्रशासनाने घटनास्थळाभोवतीचा 200 मीटरचा परिसर ‘नो-मॅन्स लँड’ म्हणून घोषित केला असून, या परिसरात बॅरिकेडिंग करण्यात आले. खबरदारीचा उपाय म्हणून स्थानिक नागरिकांना घराबाहेर पडून सुरक्षित ठिकाणी जाण्याचा सल्ला देण्यात आला. प्रभावित परिसरातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले.

प्रशासनाच्या माहितीनुसार, आतापर्यंत सुमारे 90 टक्के क्लोरीन वायूची गळती रोखण्यात यश आले आहे. वायूच्या संपर्कात आल्याने अनेक नागरिकांची प्रकृती बिघडली. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, तर काही नागरिक स्वतःहून उपचारासाठी रुग्णालयात पोहोचले. सध्या 40 जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत, तर 12 जणांना उपचारानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. गंभीररीत्या प्रभावित झालेल्या तीन ते चार रुग्णांवर अतिदक्षता विभागात (आयसीयू) उपचार सुरू आहेत. मात्र, दिलासादायक बाब म्हणजे या सर्व रुग्णांची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

दुर्घटनेत एका कुत्र्याचाही मृत्यू

पोलीस प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, परिस्थिती आता नियंत्रणात असून नागरिकांनी घाबरण्याचे कोणतेही कारण नाही. पोलीस निरीक्षकांनी नागरिकांना शांतता राखण्याचे आणि कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे. प्रशासन आणि आपत्कालीन पथके परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवून आहेत.

------------------------------

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी


 rajesh pande