
अमरावती, २५ ऑगस्ट (हिं.स.) : शहरातील रुग्णालयांमध्ये रुग्णांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने फायर ऑडिट आणि अग्निसुरक्षा प्रमाणपत्राला अत्यंत महत्त्व असताना तब्बल ९० रुग्णालयांच्या फायर ऑडिटची वैधता संपल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. महापालिका प्रशासनाकडून संबंधित रुग्णालयांना फायर ऑडिटचे नूतनीकरण करण्यासाठी वारंवार सूचना देण्यात येत असतानाही काही रुग्णालयांकडून त्याची गांभीर्याने दखल घेतली जात नसल्याचे चित्र आहे.
महापालिका हद्दीत सुमारे २४६ रुग्णालये असून, त्यापैकी १५६ रुग्णालयांच्या फायर ऑडिटची वैधता कायम आहे. तर तब्बल ९० रुग्णालयांना फायर ऑडिटचे नूतनीकरण करणे आवश्यक आहे. या यादीत शहरातील विविध खासगी रुग्णालयांसह आरोग्य सेवेशी संबंधित संस्थांचा समावेश आहे. विशेष म्हणजे जिल्हा शासकीय रुग्णालय (इर्विन), जिल्हा स्त्री रुग्णालय (डफरीन) आणि सुपर स्पेशालिटी रुग्णालय या तीन शासकीय रुग्णालयांचाही संबंधित आकडेवारीत उल्लेख आहे.
रुग्णांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न
रुग्णालयांमध्ये मोठ्या संख्येने रुग्ण, नवजात बालके, वृद्ध, गंभीर आजाराचे रुग्ण तसेच त्यांच्या नातेवाइकांची ये-जा असते. अशा ठिकाणी आग लागल्यास परिस्थिती अत्यंत गंभीर होण्याची शक्यता असते. त्यामुळे फायर ऑडिटच्या माध्यमातून अग्निशमन यंत्रणा, फायर अलार्म, अग्निशामक यंत्रे, आपत्कालीन बाहेर पडण्याचे मार्ग, विद्युत व्यवस्था आणि इतर सुरक्षा उपाययोजनांची तपासणी केली जाते.
मात्र, फायर ऑडिटची वैधता संपल्यानंतरही त्याचे नूतनीकरण न करणे हा रुग्णांच्या जीविताशी संबंधित गंभीर विषय ठरू शकतो. त्यामुळे संबंधित रुग्णालयांमध्ये आवश्यक अग्निसुरक्षा उपाययोजना प्रत्यक्षात कार्यरत आहेत की नाहीत, याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.
डफरीनमधील दुर्घटनेनंतर प्रश्न ऐरणीवर
जिल्हा स्त्री रुग्णालयातील (डफरीन) नवजात शिशु अतिदक्षता विभागात घडलेल्या आगीच्या दुर्दैवी घटनेच्या पार्श्वभूमीवर अमरावतीतील रुग्णालयांच्या अग्निसुरक्षेचा प्रश्न अधिक गंभीर झाला आहे. अशा दुर्घटनेनंतरही काही रुग्णालयांनी फायर ऑडिटचे नूतनीकरण केले नसेल, तर प्रशासनाने त्याची गांभीर्याने दखल घेण्याची गरज व्यक्त होत आहे.
रुग्णालयांतील आग प्रतिबंधक यंत्रणा कार्यरत आहे की नाही, फायर अलार्म सुरू आहेत की नाहीत, आपत्कालीन मार्ग मोकळे आहेत की नाहीत, विद्युत यंत्रणा सुरक्षित आहे की नाही आणि आग लागल्यास रुग्णांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी आवश्यक व्यवस्था उपलब्ध आहे की नाही, याची प्रत्यक्ष पाहणी करण्याची मागणी होत आहे.
केवळ नोटिसा नकोत, कारवाईची गरज
महापालिकेने ९० रुग्णालयांना फायर ऑडिटच्या नूतनीकरणासाठी सूचना दिल्यानंतरही संबंधितांनी त्याची पूर्तता केली नसेल, तर केवळ नोटिसा बजावून थांबण्याऐवजी नियमानुसार कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
रुग्णालयातील अग्निसुरक्षेचा प्रश्न हा केवळ प्रशासकीय कागदपत्रांचा विषय नसून थेट नागरिकांच्या जीविताशी संबंधित आहे. त्यामुळे फायर ऑडिटची वैधता संपलेल्या सर्व ९० रुग्णालयांची तातडीने तपासणी करून नूतनीकरणाची प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी. तसेच आवश्यक अग्निसुरक्षा उपाययोजना नसलेल्या रुग्णालयांवर नियमानुसार कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
डफरीनसारख्या दुर्घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी महापालिका प्रशासनाने आता केवळ सूचना देण्याऐवजी प्रत्यक्ष तपासणी आणि आवश्यक कारवाई करण्याची गरज आहे.
---------------------------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी