
अमरावती, 25 ऑगस्ट (हिं.स.) | यंदा 'एल निनो'च्या प्रभावामुळे पावसाची तुट असल्याने ग्रामीण भागात आताच पाणीटंचाईचे सावट आहे. जुलै ते सप्टेंबर २०२६ या कालावधीत तब्बल ३७० गावे व वाड्यांमध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. या संभाव्य संकटाचा सामना करण्यासाठी प्रशासनाने ३८४ उपाययोजनांचा कृती आराखडा तयार केला असून, यावर १२.५७ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.
जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी या पार्श्वभूमीवर बैठक घेऊन जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाला प्रस्तावित आराखडा तयार करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार संभाव्य पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी कृती आराखडा तयार करून विविध उपाययोजना प्रस्तावित करण्यात आल्या आहेत. त्या उन्हाळ्यातील पाणीटंचाईचा सामना करण्यास पर्याय ठरणार आराखड्यात आहेत. प्रस्तावित नळ योजनांची विशेष दुरुस्ती आणि खासगी विहिरी अधिग्रहणावर भर देण्यात आला आहे. जिल्ह्यातील १५० गावांमध्ये नळ योजनांच्या दुरुस्तीसाठी १८२.५० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तसेच विहिरींमधील पाणीसाठा घटल्याने १३३ गावांमध्ये १३६ खाजगी विहिरींचे अधिग्रहण करण्यात येणार आहे.
मेळघाटात सर्वाधिक झळ
पाणीटंचाईचा सर्वाधिक फटका धारणी आणि चिखलदरा या तालुक्यांना बसणार आहे. चिखलदरा तालुक्यात ५८ गावांमध्ये १०४ उपाययोजना प्रस्तावित असून त्यासाठी २२८.७४ लाख रुपये, तर धारणी तालुक्यात ३८ गावांमध्ये ३८ उपाययोजनांसाठी २६७.२० लाख रुपयांचा निधी प्रस्तावित आहे. याशिवाय वरुड (६३ गावे, २३२.५० लाख) आणि तिवसा (२५ गावे, १४०.४८ लाख) या तालुक्यांमध्येही परिस्थिती गंभीर राहण्याची शक्यता आहे.
पाणीटंचाईची संभाव्य स्थिती
प्रभावित गावे/वाड्या - ३७०
एकूण उपाययोजना - ३८४
प्रस्तावित खर्च - १२.५७ कोटी
टंचाईचा कालावधी - जुलै ते सप्टेंबर
टँकरने पुरवठा - १९ गावे
१९ गावांवर टँकरने पाणीपुरवठ्याची वेळ येणार आहे. यासाठी ३८ लाखांची, तर ४१ गावांमध्ये विहिरी खोल करणे व गाळ काढण्याच्या ४२ कामांसाठी १०९ लाख रुपये खर्च केले जातील.
प्रस्तावित उपाययोजना आणि खर्च
नळ योजना दुरुस्ती - १५० कामे (१८२.५० लाख)
खासगी विहिरी अधिग्रहण - १३६ विहिरी (७२.०२ लाख)
विहिरी खोल करणे - ४२ कामे (१०९ लाख)
नवीन विंधन विहिरी - २५ (३२ लाख)
स्रोत बळकटीकरण - १२ कामे (२४ लाख)
-------------------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी