
अमरावती, 25 ऑगस्ट (हिं.स.)। जिल्हा स्त्री रुग्णालयातील नवजात शिशू अतिदक्षता विभागात (SNCU) लागलेल्या आगीत तीन नवजात बालकांचा मृत्यू झाल्याच्या दुर्दैवी घटनेची राज्य शासनाने गंभीर दखल घेतली असून, या प्रकरणाच्या उच्चस्तरीय चौकशीला आता वेग आला आहे.
आरोग्य विभागाने घटनेमागील नेमकी कारणे आणि संभाव्य प्रशासकीय हलगर्जीपणाची चौकशी करण्यासाठी विशेष समिती गठीत केली आहे. या चौकशी समितीच्या प्रमुख तथा आरोग्य विभागाच्या सहसंचालक डॉ. सुनिता गोल्हाईत आज अमरावतीत दाखल झाल्या. अमरावतीत पोहोचताच त्यांनी जिल्हा शल्यचिकित्सक तथा प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ. विनोद पवार आणि वरिष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्यांसोबत बैठकींचे सत्र सुरू केले आहे. या बैठकीत घटनेशी संबंधित विविध बाबींची माहिती घेतली जात असून, रुग्णालय प्रशासनाकडील कागदपत्रांचीही तपासणी केली जात आहे.
विशेष म्हणजे, या अग्निकांडाच्या पार्श्वभूमीवर व्हेंटिलेटरमध्ये नेमका तांत्रिक बिघाड कसा झाला, त्यानंतर आग कशी भडकली आणि त्यावेळी SNCU विभागात सुरक्षेच्या कोणत्या उपाययोजना कार्यरत होत्या, याचा तपास केला जात आहे. त्याचबरोबर रुग्णालयाच्या फायर ऑडिटची मुदत संपत आलेली असताना त्याबाबत कोणती कार्यवाही करण्यात आली, याचीही चौकशी समिती पडताळणी करणार आहे. फायर ऑडिटसाठी संबंधित विभागाकडे पाठपुरावा करण्यात आला होता का? सार्वजनिक बांधकाम विभागाकडून आवश्यक कामांमध्ये दिरंगाई झाली का? रुग्णालयातील अग्निसुरक्षा यंत्रणा आणि स्प्रिंकलर यंत्रणा घटनेच्या वेळी कार्यरत होती का ? तसेच व्हेंटिलेटरच्या देखभाल-दुरुस्तीची जबाबदारी असलेल्या संबंधित यंत्रणेने व तांत्रिक तपासणी केली होती का, यावरही समितीचा भर राहणार आहे.
दरम्यान, घटनेच्या वेळी प्रत्यक्ष परिस्थिती काय होती, रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी कोणती पावले उचलली आणि बचावकार्यामध्ये काही त्रुटी राहिल्या का, याचीही माहिती घेतली जाणार आहे. उच्चस्तरीय चौकशी समितीचा अहवाल या संपूर्ण प्रकरणातील जबाबदारी निश्चित करण्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे. त्यामुळे चौकशीनंतर नेमक्या कोणत्या अधिकारी, कर्मचारी, तांत्रिक यंत्रणा किंवा कंत्राटदारांची जबाबदारी निश्चित होते आणि दोषींवर कोणती कारवाई केली जाते, याकडे आता अमरावतीसह संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
---------------------------------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी