अमरावतीच्या जिल्हा परिषद शाळांची सीईओंकडून पाहणी
अमरावती, २५ ऑगस्ट (हिं.स.) : जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांना सुरक्षित, स्वच्छ आणि सुविधायुक्त शैक्षणिक वातावरण मिळावे, यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यम गांधी यांनी गेल्या तीन दिवसांपासून जिल्ह्यातील विविध शाळांची पाहणी सु
मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यम गांधींकडून शाळांमधील सुविधांची पाहणी प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याचे आदेश


अमरावती, २५ ऑगस्ट (हिं.स.) : जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांना सुरक्षित, स्वच्छ आणि सुविधायुक्त शैक्षणिक वातावरण मिळावे, यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यम गांधी यांनी गेल्या तीन दिवसांपासून जिल्ह्यातील विविध शाळांची पाहणी सुरू केली आहे. विद्यार्थी सुरक्षा, स्वच्छता, पायाभूत सुविधा आणि आवश्यक सोयी या चार प्रमुख बाबींवर त्यांनी विशेष लक्ष केंद्रित केले असून, त्रुटी आढळलेल्या ठिकाणी तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

सीईओ गांधी यांनी सुरुवातीला भातकुली, चांदूर बाजार आणि अमरावती या तीन तालुक्यांतील शाळांची पाहणी केली. त्यानंतर सोमवारी नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील दाभा, जळू, माहुली चोर आणि धानोरा गुरव येथील शाळांना भेट दिली. पाहणीदरम्यान आढळलेल्या त्रुटींवर बांधकाम आणि शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना देण्यात आल्या.चांदूर बाजार तालुक्यातील आसेगाव येथील जिल्हा परिषद शाळेपासून पाहणी दौऱ्याची सुरुवात झाली. येथे सीसीटीव्ही कॅमेरे, टीव्ही संच, विद्युत सुविधा, क्रीडांगण, क्रीडा साहित्य, मुला-मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे तसेच शाळेच्या इमारतीची पाहणी करण्यात आली. आवश्यक दुरुस्तीची कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश सीईओ गांधी यांनी दिले.यानंतर पंचायत समिती भातकुली अंतर्गत पूर्णानगर येथील मुलांची आणि कन्यांची शाळा या दोन्ही ठिकाणी त्यांनी भेट दिली. किरकोळ दुरुस्तीची कामे पूर्ण करण्यासोबतच प्रत्येक वर्गखोलीत दोन सीलिंग पंखे बसविण्याच्या सूचना देण्यात आल्या.

पंचायत समिती अमरावती अंतर्गत जि.प. माध्यमिक उर्दू शाळा, वलगाव येथेही चार प्रमुख निकषांच्या आधारे पाहणी करण्यात आली. विशेषतः विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या पिण्याच्या पाण्याची स्वच्छता आणि सुरक्षितता याबाबत आवश्यक दक्षता घेण्याचे निर्देश सीईओंनी दिले.जि.प. उच्च प्राथमिक डिजिटल उर्दू शाळा, नांदगाव पेठ येथे भेट देऊन गांधी यांनी शाळेच्या शैक्षणिक, भौतिक आणि क्रीडा क्षेत्रातील कामगिरीचा आढावा घेतला. मुख्याध्यापक, शिक्षक आणि उपस्थित अधिकाऱ्यांशी संवाद साधून शाळेच्या गरजा तसेच उपलब्ध सुविधांची माहिती घेतली.

नांदगाव पेठ येथील शाळेची जागा मर्यादित असून, नवीन बांधकामासाठी पुरेशी जागा उपलब्ध नसल्याचे पाहणीदरम्यान निदर्शनास आले. तसेच कनिष्ठ महाविद्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारापासून कार्यालयापर्यंत सुमारे १५० मीटरच्या रस्त्यावरून ये-जा करताना विद्यार्थ्यांना अडचणी येत असल्याचे समोर आले.या पार्श्वभूमीवर संबंधित रस्त्यावर पेव्हिंग ब्लॉक बसवून तो सुस्थितीत करण्याबाबत बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना निर्देश देण्यात आले.

पाहणी दौऱ्यावेळी अनुपस्थित राहिल्याबद्दल चांदूर बाजार आणि भातकुली येथील गटशिक्षण अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. तसेच इतर अधिकाऱ्यांनी कामे केवळ कागदावर न ठेवता ती प्रत्यक्ष पूर्णत्वास न्यावीत, असे सीईओ गांधी यांनी स्पष्ट केले.आवश्यक कामांसाठी तातडीने प्रस्ताव सादर करून प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्याचे निर्देशही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. त्यामुळे जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थी सुरक्षा आणि मूलभूत सुविधांच्या सुधारणेला आता अधिक वेग मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

---------------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande