डीडीसी बँक निवडणुकीपूर्वी सोलापूरच्या राजकारणात हालचालींना वेग
स्वतंत्र पॅनलच्या शक्यतेने समीकरणे बदलण्याची शक्यता सोलापूर, २५ ऑगस्ट (हिं.स.) : सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (डीडीसी बँक) आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कृषी उत्पन्न बाज
dcc


स्वतंत्र पॅनलच्या शक्यतेने समीकरणे बदलण्याची शक्यता

सोलापूर, २५ ऑगस्ट (हिं.स.) : सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (डीडीसी बँक) आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत स्वतंत्र पॅनल उभे करून राजकीय ताकद दाखविणाऱ्या दोन देशमुखांकडून यावेळीही स्वतंत्र भूमिका घेण्याच्या हालचाली सुरू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

डीडीसी बँकेच्या निवडणुकीत दोन देशमुख विरुद्ध पालकमंत्री असा राजकीय संघर्ष उफाळून येण्याची शक्यता व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर विविध नेते आणि त्यांच्या समर्थकांच्या बैठका सुरू झाल्याची चर्चा असून, संभाव्य पॅनलची बांधणी, मतदारसंघनिहाय समीकरणे तसेच सहकारी संस्थांमधील प्रतिनिधींची जुळवाजुळव यावर खलबते सुरू असल्याचे बोलले जात आहे.

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीप्रमाणे डीडीसी बँकेच्या निवडणुकीतही स्वतंत्र पॅनल उभे राहिल्यास जिल्ह्यातील सत्ताधारी राजकीय समीकरणांसमोर मोठे आव्हान निर्माण होऊ शकते. सहकार क्षेत्रातील प्रभाव, विविध संस्थांचे प्रतिनिधित्व आणि आगामी राजकीय वाटचाल लक्षात घेऊन दोन्ही बाजूंनी मोर्चेबांधणी सुरू असल्याचे चित्र आहे.

दरम्यान, अद्याप कोणत्याही गटाकडून स्वतंत्र पॅनल किंवा निवडणुकीतील अधिकृत भूमिका जाहीर करण्यात आलेली नाही. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या चर्चांना अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. मात्र, पडद्यामागील हालचालींना वेग आल्याने डीडीसी बँकेची निवडणूक केवळ सहकार क्षेत्रापुरती मर्यादित न राहता जिल्ह्याच्या राजकारणातील प्रतिष्ठेची लढाई ठरण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

आगामी काळात कोण कोणासोबत जाणार, कोणता गट स्वतंत्र पॅनल उभा करणार आणि सहकारातील या सत्तासंघर्षात बाजी कोण मारणार, याकडे संपूर्ण सोलापूर जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

------------------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande