अमरावतीच्या जिल्हा स्त्री रुग्णालयावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी
अमरावती, २५ ऑगस्ट (हिं.स.) : जिल्हा स्त्री रुग्णालयातील एनआयसीयू विभागात तीन नवजात शिशूंचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने संतप्त पालक आणि नातेवाईकांनी गाडगेनगर पोलीस ठाण्यात धाव घेतली. संबंधित डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यासह सदोष मनुष्यवधाचा गुन
दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी पालकांचा आक्रोश :गाडगेनगर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद


अमरावती, २५ ऑगस्ट (हिं.स.) : जिल्हा स्त्री रुग्णालयातील एनआयसीयू विभागात तीन नवजात शिशूंचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने संतप्त पालक आणि नातेवाईकांनी गाडगेनगर पोलीस ठाण्यात धाव घेतली. संबंधित डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यासह सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी पालकांनी केली.

घटनेनंतर मृत शिशूंचे पालक, नातेवाईक तसेच प्रहार संघटनेचे पदाधिकारी संतप्त झाले. त्यांनी गाडगेनगर पोलीस ठाण्यात जाऊन रुग्णालयातील कथित हलगर्जीपणाबाबत पोलिसांना माहिती दिली. तसेच एनआयसीयू विभागातील संबंधित डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली.

पोलिसांनी पालकांचे म्हणणे सविस्तर ऐकून घेतल्यानंतर तीन मृत शिशूंच्या मृत्यूबाबत स्वतंत्रपणे तीन आकस्मिक मृत्यूंची नोंद केली आहे. या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला असून, नवजात शिशूंच्या मृत्यूचे नेमके कारण काय होते आणि यासाठी कोण जबाबदार आहे, याचा तपास केला जाणार आहे.

दरम्यान, चौकशीत तथ्य समोर आल्यानंतर आणि संबंधितांचा दोष आढळल्यास योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती पोलिसांनी दिली. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार गाडगेनगर पोलिसांनी विविध अंगांनी चौकशीला सुरुवात केली आहे.

या प्रकरणाच्या चौकशीतून रुग्णालयातील कथित हलगर्जीपणाबाबत नेमके काय तथ्य समोर येते, याकडे आता पालकांसह नागरिकांचे लक्ष लागले आहे.

-----------------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande