चिखलदऱ्यात शिक्षकांची १३४ पदे रिक्त; आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होण्याची शक्यता
अमरावती, २५ ऑगस्ट (हिं.स.) : चिखलदरा तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षकांची तब्बल १३४ पदे रिक्त असल्याने शिक्षण विभागाचा कारभार सध्या तात्पुरत्या व्यवस्थेवर सुरू आहे. शिक्षकांच्या कमतरतेचा थेट परिणाम आदिवासी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत
तात्पुरत्या व्यवस्थेवर शिक्षण विभागाचा कारभार


अमरावती, २५ ऑगस्ट (हिं.स.) : चिखलदरा तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षकांची तब्बल १३४ पदे रिक्त असल्याने शिक्षण विभागाचा कारभार सध्या तात्पुरत्या व्यवस्थेवर सुरू आहे. शिक्षकांच्या कमतरतेचा थेट परिणाम आदिवासी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर होण्याची शक्यता व्यक्त होत असून, नियमित शिक्षकांची नियुक्ती कधी होणार, असा प्रश्न पालकांकडून उपस्थित केला जात आहे.

शिक्षकांची रिक्त पदे भरण्यासाठी लवकरच पवित्र पोर्टलच्या माध्यमातून पेसा क्षेत्रातील शिक्षक भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. या भरतीमुळे तालुक्यातील शाळांना आवश्यक संख्येने शिक्षक उपलब्ध होतील, अशी अपेक्षा शिक्षण विभागाने व्यक्त केली आहे.

नियमित शिक्षक उपलब्ध होईपर्यंत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी शिक्षण विभागाकडून तात्पुरती व्यवस्था करण्यात आली आहे. जिल्हा परिषद शाळा भूतृम येथील एका शिक्षकाची तीन दिवस डोमी आणि तीन दिवस कुही येथील शाळेत शैक्षणिक कार्यासाठी नियुक्ती करण्यात आली आहे.

मात्र, एकाच शिक्षकावर दोन शाळांची जबाबदारी सोपविण्याची वेळ शिक्षण विभागावर आल्याने या व्यवस्थेतून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा कितपत पूर्ण होणार, असा प्रश्न पालकांकडून उपस्थित केला जात आहे.

दुर्गम आणि आदिवासीबहुल भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळण्यासाठी शाळांमध्ये पुरेसे शिक्षक उपलब्ध असणे आवश्यक आहे. सध्या तात्पुरत्या व्यवस्थेमुळे शैक्षणिक कामकाज सुरू असले तरी दीर्घकालीन उपाय म्हणून नियमित शिक्षकांची नियुक्ती करणे गरजेचे आहे.

विद्यार्थ्यांच्या हितासाठी करण्यात आलेली ही व्यवस्था केवळ तात्पुरत्या स्वरूपाची असून, लवकरच नियमित शिक्षक उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासन स्तरावर कार्यवाही सुरू असल्याचे गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती चिखलदरा यांनी स्पष्ट केले आहे.

दरम्यान, पेसा क्षेत्रातील शिक्षक भरती प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करून चिखलदरा तालुक्यातील दुर्गम भागातील शाळांमधील रिक्त पदे भरावीत आणि आदिवासी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळावे, अशी मागणी पालक आणि नागरिकांकडून होत आहे.

-----------------------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande