अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयातील फायर ऑडिटवर प्रश्नचिन्ह
मुदत संपत असल्याने महिनाभर आधीपासून पीडब्ल्यूडीकडे पाठपुरावा वेळेत पाहणी न झाल्याचा रुग्णालय प्रशासनाचा आरोप अमरावती, २५ ऑगस्ट (हिं.स.) : जिल्हा स्त्री रुग्णालयातील नवजात बालकांच्या आगीत झालेल्या मृत्यूच्या घटनेनंतर रुग्णालयातील अग्निसुरक्षेचा म
फायर ऑडिटसाठी महिनाभर पाठपुरावा, तरी PWDची उडवाउडवी!


मुदत संपत असल्याने महिनाभर आधीपासून पीडब्ल्यूडीकडे पाठपुरावा

वेळेत पाहणी न झाल्याचा रुग्णालय प्रशासनाचा आरोप

अमरावती, २५ ऑगस्ट (हिं.स.) : जिल्हा स्त्री रुग्णालयातील नवजात बालकांच्या आगीत झालेल्या मृत्यूच्या घटनेनंतर रुग्णालयातील अग्निसुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. फायर ऑडिटची मुदत संपत असल्याची माहिती असतानाही सार्वजनिक बांधकाम विभागाकडून (PWD) वेळेत पाहणी आणि आवश्यक कार्यवाही झाली नसल्याचा गंभीर आरोप रुग्णालय प्रशासनाने केला आहे.

जिल्हा शल्यचिकित्सक तथा प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ. विनोद पवार यांनी या प्रकरणावर संताप व्यक्त केला. फायर ऑडिटची मुदत संपत असल्याने महिनाभर आधीपासूनच बांधकाम विभागाकडे सातत्याने पाठपुरावा सुरू होता, असे त्यांनी स्पष्ट केले. यासाठी पत्रव्यवहाराबरोबरच दूरध्वनीवरूनही संबंधित अधिकाऱ्यांशी वारंवार संपर्क साधण्यात आला होता, असे पवार यांनी सांगितले.

रुग्णालयातील अग्निसुरक्षा यंत्रणेची प्रत्यक्ष पाहणी करून तातडीने अहवाल द्यावा, अशी विनंती आरोग्य विभागाकडून करण्यात आली होती. मात्र, पीडब्ल्यूडी कडून आरोग्य विभागाला सातत्याने उडवाउडवीची उत्तरे मिळत होती, असा दावा डॉ. पवार यांनी केला आहे.

दरम्यान, रुग्णालयात आग लागल्यानंतर फायर सेफ्टी यंत्रणा, स्प्रिंकलर तसेच अन्य अग्निसुरक्षा उपाययोजनांबाबत प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. फायर ऑडिट वेळेत का झाले नाही, आरोग्य विभागाच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतरही पीडब्ल्यूडीने तातडीने कारवाई का केली नाही आणि संबंधित यंत्रणांकडून दुर्लक्ष का झाले, याची सखोल चौकशी करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.

तीन नवजात बालकांचा जीव गेल्यानंतर संबंधित यंत्रणांची जबाबदारी निश्चित होणार का, असा संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे. फायर ऑडिटमध्ये नेमकी दिरंगाई कुणाकडून झाली आणि त्यासाठी कोण जबाबदार आहे, हे चौकशीतून स्पष्ट होणे गरजेचे असल्याची मागणी होत आहे.

---------------------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande