
अमरावती, 25 ऑगस्ट (हिं.स.)। अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयात व्हेंटिलेटरच्या स्फोटानंतर लागलेल्या आगीत तीन नवजात बाळांचा मृत्यू झाल्याच्या गंभीर घटनेची उच्चस्तरीय चौकशी आता वेगाने सुरू होणार आहे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी नियुक्त करण्यात आलेली उच्चस्तरीय समिती उद्या सकाळी दहा वाजता अमरावतीत दाखल होणार आहे.
समिती जिल्हा स्त्री रुग्णालयाला प्रत्यक्ष भेट देऊन घटनास्थळाची पाहणी करणार असून, आग नेमकी कोणत्या कारणामुळे लागली, यासह रुग्णालयातील सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला जाणार आहे. विशेषतः फायर ऑडिटची स्थिती, अग्निसुरक्षा यंत्रणा, विद्युत व्यवस्थेतील संभाव्य त्रुटी आणि व्हेंटिलेटरच्या तांत्रिक स्थितीची तपासणी समितीकडून केली जाण्याची शक्यता आहे.
घटना घडली त्यावेळी रुग्णालयात उपस्थित असलेल्या डॉक्टर, परिचारिका, कर्मचारी तसेच संबंधित अधिकाऱ्यांचे जबाब समितीकडून नोंदवून घेतले जाणार आहेत. आग लागल्यानंतर बचावकार्य कशा पद्धतीने झाले, अग्निशमन यंत्रणा वेळेत कार्यरत होती का आणि रुग्णालय प्रशासनाकडून कोणत्या उपाययोजना करण्यात आल्या, याचाही तपास केला जाणार आहे.या घटनेच्या पार्श्वभूमीवर रुग्णालय प्रशासनाच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. त्यामुळे समितीच्या चौकशी अहवालाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
चौकशी पूर्ण झाल्यानंतर पुढील आठ दिवसांत समिती आपला अहवाल शासनाकडे सादर करण्याची शक्यता आहे. या अहवालातून दुर्घटनेमागील नेमकी कारणे आणि या प्रकरणात दोषी कोण, याबाबत महत्त्वाचे निष्कर्ष समोर येण्याची शक्यता आहे.
चौकशी समिती
आरोग्य विभागाचे आयुक्त संजय काटकर यांच्या अध्यक्षतेखाली सात सदस्यीय समिती नेमण्यात आली आहे. या समितीत महाराष्ट्र विद्युत महामंडळाचे मुख्य अभियंते, एम्सचे वरिष्ठ अधिकारी, वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाचे वरिष्ठ अधिकारी यांचा समावेश असणार आहे. येत्या आठ दिवसात घटनेचा सखोल तपास करून प्रत्यक्ष जबाबदार असलेल्याविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल. ही समिती समस्येच्या खोलवर जाऊन कारणे शोधणार आहे. व्हेंटिलेटर, वीज यंत्रणेतील दोष, फायर ऑडिट, तसेच अन्य अनियमितता यांची सखोल तपासणी करेल.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी