
अमरावती, २५ ऑगस्ट (हिं.स.) : रक्षाबंधनाचा सण जवळ आल्याने भावंडांमधील प्रेमाचा धागा वेळेत पोहोचवण्यासाठी टपाल विभाग सज्ज झाला आहे. राख्या पाठवण्यासाठी वाढणारी गर्दी लक्षात घेता ग्राहकांची गैरसोय टाळण्यासाठी अमरावती रेल्वे स्थानकातील टपाल सेवा केंद्रात एक अतिरिक्त काउंटर सुरू करण्यात आला आहे. हे अतिरिक्त काउंटर २८ ऑगस्टपर्यंत सुरू राहणार असल्याची माहिती उपअभिलेख अधिकारी प्रकाश हागे यांनी दिली.
सध्या टपाल मुख्यालयासह जिल्ह्यातील विविध टपाल कार्यालयांमध्ये राख्या पाठवण्यासाठी बुकिंग सुरू असून, नागरिकांची गर्दी वाढली आहे. देशाच्या विविध भागांत तसेच परदेशात राहणाऱ्या भावंडांना राखी वेळेत पोहोचावी यासाठी स्पीड पोस्ट, पार्सल, रजिस्टर्ड पोस्ट आणि आंतरराष्ट्रीय टपाल सेवांचा वापर केला जात आहे.राख्या सुरक्षितपणे पाठवण्यासाठी टपाल विभागाकडून आकर्षक आणि विशेष राखी पाकिटे उपलब्ध करून देण्यात आली आहेत. ग्राहकांना पार्सल सेवेसोबतच आयटीपीएसची सुविधाही मिळत असल्याने परदेशातील भावंडांना राखी पाठवणे सुलभ झाले आहे.सध्या जिल्ह्यातून दररोज हजाराहून अधिक पार्सल्स पाठवली जात असल्याचे सांगण्यात आले. राखीसोबत इतर भेटवस्तूही टपालाद्वारे पाठवल्या जात आहेत.
डिजिटल युगातही टपालाची भावनिक नाळ कायम
आजच्या डिजिटल युगात व्हिडिओ कॉल, ऑनलाइन भेटवस्तू आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छा देणे सहज शक्य झाले आहे. मात्र, प्रत्यक्ष हाताने निवडलेली राखी टपालाद्वारे भावापर्यंत पोहोचवण्याची भावना आजही कायम आहे.परदेशात किंवा दुसऱ्या शहरात नोकरी-व्यवसायानिमित्त राहणाऱ्या भावंडांपर्यंत पोहोचणारी राखी ही केवळ एक वस्तू नसून प्रेम आणि आपुलकीचा भावनिक संदेश ठरत आहे. त्यामुळे खाजगी कुरिअर किंवा ऑनलाइन पर्याय उपलब्ध असतानाही अनेक नागरिक टपाल सेवेला पसंती देत आहेत.
राखीच्या प्रवासामागे मोठी यंत्रणा
टपाल काउंटरवर बुकिंग झाल्यानंतर राखीचा प्रवास बारकोडिंग, मेल बॅग, सॉर्टिंग, वाहतूक, गंतव्य शहरातील प्रक्रिया, वितरण कार्यालय आणि अखेरीस पोस्टमनपर्यंत पोहोचतो. त्यानंतरच ती राखी भावाच्या हातात पोहोचते.जिल्ह्यातील ३५४ टपाल केंद्रांचे विस्तृत जाळे आणि त्यामागे कार्यरत असलेली टपाल यंत्रणा या संपूर्ण प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावते. देशातील विविध शहरांपासून थेट परदेशापर्यंत राख्या पोहोचवण्याची जबाबदारी या यंत्रणेवर आहे.एका काउंटरवर बुक झालेल्या राखीला अंतिम ठिकाणी पोहोचण्यासाठी अनेक टप्प्यांतून जावे लागते. त्यामुळे या छोट्याशा प्रेमाच्या धाग्यामागे टपाल विभागाची मोठी यंत्रणा आणि कर्मचाऱ्यांचे अथक श्रम दडलेले आहेत.
----------------------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी