
सोलापूर, २५ ऑगस्ट (हिं.स.) : सोलापूर महानगरपालिकेच्या माजी नगर अभियंता सारिका अकुलवार यांच्याशी संबंधित कथित आर्थिक अनियमिततेच्या प्रकरणावरून नगरसेवक अनंत जाधव यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून आरोप सिद्ध झाल्यास संबंधितांविरोधात फौजदारी कारवाई करावी, अशी ठाम मागणी जाधव यांनी केली आहे.
महापालिकेच्या निधीचा गैरवापर झाला असल्यास किंवा महापालिकेचे आर्थिक नुकसान झाले असल्याचे चौकशीत निष्पन्न झाल्यास संबंधितांची जबाबदारी निश्चित करून दीड कोटी रुपये महापालिकेच्या तिजोरीत जमा करावेत, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
“फौजदारी कारवाई झाल्याशिवाय आणि महापालिकेच्या पैशांची वसुली झाल्याशिवाय गप्प बसणार नाही,” अशी भूमिका नगरसेवक अनंत जाधव यांनी घेतली आहे.
महापालिकेच्या तिजोरीतील प्रत्येक रुपया हा जनतेच्या करातून जमा झालेला असल्याने आर्थिक अनियमिततेच्या आरोपांची गांभीर्याने चौकशी होणे आवश्यक असल्याचे जाधव यांनी म्हटले आहे. चौकशीत दोष सिद्ध झाल्यास संबंधितांवर फौजदारी कारवाई करण्याबरोबरच महापालिकेला झालेल्या नुकसानीची भरपाई वसूल करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
दरम्यान, या प्रकरणात महापालिका प्रशासन कोणती भूमिका घेते, चौकशीचा निष्कर्ष काय येतो आणि कथित नुकसान झाल्याचे सिद्ध झाल्यास दीड कोटी रुपयांची वसुली होते का, याकडे सोलापूरकरांचे लक्ष लागले आहे.
--------------------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड