
शिवसेनेचे २७ ऑगस्टला ‘जाब विचारा’ आंदोलन
अमरावती, २५ ऑगस्ट (हिं.स.) : दर्यापूर कृषी उत्पन्न बाजार समितीतील एका संचालकाच्या कथित वक्तव्यावरून तालुक्यातील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शेतकरी आणि हमालांनी भगवा दुपट्टा घालू नये, अशा आशयाचे वक्तव्य बाजार समितीच्या एका संचालकाने केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी बाजार समितीकडे तक्रार करूनही अद्याप कोणतीही कारवाई झालेली नसल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे.
या पार्श्वभूमीवर शिवसेनेतर्फे २७ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी १ वाजता दर्यापूर कृषी उत्पन्न बाजार समिती येथे ‘जाब विचारा’ आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनाची माहिती पोलिसांना देण्यात आली असून, शिवसेनेचे नेते गोपाल अरबट यांनी दर्यापूर पोलीस ठाण्याच्या ठाणेदारांना लेखी निवेदन साद केले आहे.
संबंधित संचालकाने केलेल्या कथित वक्तव्याची चौकशी करून दोष आढळल्यास योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात येणार असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
बाजार समितीकडे तक्रार करण्यात आल्यानंतरही कारवाई न झाल्याने शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यामुळे आगामी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दर्यापूर बाजार समिती परिसरातील राजकीय हालचालींना वेग आला आहे.
दरम्यान, या आरोपांबाबत बाजार समितीच्या संबंधित संचालकांची अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नाही. त्यामुळे कथित वक्तव्य नेमके कोणत्या संदर्भात करण्यात आले आणि त्याबाबत बाजार समिती प्रशासनाची भूमिका काय आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
२७ ऑगस्ट रोजी होणाऱ्या ‘जाब विचारा’ आंदोलनाकडे आता दर्यापूर तालुक्याचे लक्ष लागले आहे.
------------------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी