श्री मार्कंडेय महामुनी रथोत्सवासाठी सोलापूर महापालिका ‘ऍक्शन मोड’मध्ये
सोलापूर, २५ ऑगस्ट (हिं.स.) : पद्मशाली समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या श्री मार्कंडेय महामुनी रथोत्सवाची भव्य मिरवणूक यंदा सुरक्षित आणि कोणत्याही अडथळ्याविना पार पडावी, यासाठी सोलापूर महानगरपालिका ‘अॅक्शन मोड’मध्ये आली आहे. रथोत्सवाच्या नियोजनासाठी मह
Mahapor


सोलापूर, २५ ऑगस्ट (हिं.स.) : पद्मशाली समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या श्री मार्कंडेय महामुनी रथोत्सवाची भव्य मिरवणूक यंदा सुरक्षित आणि कोणत्याही अडथळ्याविना पार पडावी, यासाठी सोलापूर महानगरपालिका ‘अॅक्शन मोड’मध्ये आली आहे. रथोत्सवाच्या नियोजनासाठी महापौर कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीत मिरवणूक मार्गावरील सर्व अडथळे तातडीने दूर करण्याचे स्पष्ट निर्देश महापौर विनायक कोंड्याल यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

रथोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पद्मशाली संस्थेचे अध्यक्ष सुरेश फलमारी यांनी मिरवणुकीचा मार्ग आणि आवश्यक नागरी सुविधांबाबत प्रशासनाला सविस्तर माहिती दिली. यावेळी मार्गावरील खड्डे, रस्त्यांची दुरवस्था, वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या वस्तू, वाढलेल्या झाडांच्या फांद्या, ड्रेनेजच्या समस्या तसेच विद्युत व्यवस्थेतील त्रुटींवर विशेष चर्चा करण्यात आली.

“रथोत्सव हा केवळ धार्मिक कार्यक्रम नसून सोलापूरच्या सांस्कृतिक परंपरेचा उत्सव आहे. हजारो भाविक सहभागी होणार असल्याने मिरवणूक मार्ग सुरक्षित आणि अडथळामुक्त असलाच पाहिजे. कोणत्याही विभागाने कामात हलगर्जीपणा करू नये,” असा स्पष्ट संदेश महापौर विनायक कोंड्याल यांनी दिला.

महापौरांनी संबंधित अधिकाऱ्यांना मिरवणूक मार्गाची प्रत्यक्ष पाहणी करून ‘स्पॉटवरच’ समस्या निश्चित करण्याचे निर्देश दिले. रस्त्यांवरील खड्डे बुजविणे, धोकादायक झाडांच्या फांद्या छाटणे, ड्रेनेजची कामे पूर्ण करणे, विद्युत व्यवस्थेची तपासणी करणे, स्वच्छता राखणे तसेच अग्निशमन विभागाची आवश्यक तयारी ठेवण्यावर भर देण्यात आला.

सभागृह नेते नरेंद्र काळे आणि शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर यांनीही रथोत्सवाचे धार्मिक व सामाजिक महत्त्व लक्षात घेऊन महापालिका प्रशासन आणि पद्मशाली समाजाच्या संस्थांनी समन्वयाने काम करण्याची गरज व्यक्त केली.

बैठकीला उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, सभागृह नेते नरेंद्र काळे, स्थायी समिती सभापती रंजीता चाकोते, शहराध्यक्ष तथा नगरसेविका रोहिणी तडवळकर, माजी महापौर कांचना यन्नम, अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, नगर अभियंता नीलकंठ मठपती, पद्मशाली संस्थेचे पदाधिकारी तसेच महापालिकेच्या विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

रथोत्सवाच्या मिरवणुकीला मोठ्या संख्येने भाविक उपस्थित राहणार असल्याने यंदा ‘रथोत्सव मार्ग अडथळामुक्त’ करण्याचे आव्हान महापालिकेने स्वीकारले आहे. त्यामुळे आगामी काही दिवसांत मिरवणूक मार्गावरील नागरी कामांना वेग येण्याची शक्यता आहे.

------------------------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande