
अमरावती, २५ ऑगस्ट (हिं.स.) : नांदगाव खंडेश्वर पंचायत समिती क्षेत्रातील तांडा वस्ती विकास योजनेअंतर्गत सुमारे ३३ लाख रुपयांच्या विकासकामांची निविदा प्रक्रिया गेल्या १५ दिवसांपासून रखडल्याने संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे. निविदा सादर होऊनही ती अद्याप उघडण्यात न आल्याने सुशिक्षित बेरोजगार कंत्राटदारांनी आक्रमक पवित्रा घेतला असून, आंदोलनाचा इशारा दिला आहे.
गटविकास अधिकारी, पंचायत समिती नांदगाव खंडेश्वर यांच्या माध्यमातून या विकासकामांसाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात आली होती. मात्र, निविदा सादर करण्याची प्रक्रिया पूर्ण होऊन १५ दिवसांचा कालावधी उलटला असतानाही निविदा अद्याप उघडण्यात आलेली नसल्याचा आरोप कंत्राटदारांनी केला आहे.
या निविदेला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाल्याने तीव्र स्पर्धा निर्माण झाली आहे. त्यामुळे विकासकामे कमी दरात देण्याची शक्यता असल्याचे कंत्राटदारांचे म्हणणे आहे. मात्र, निविदा प्रक्रिया पारदर्शकपणे पार पडण्याऐवजी ती 'मॅनेज' करण्याचा प्रयत्न सुरू असल्याची चर्चा असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
निविदा आपल्या मनाप्रमाणे मॅनेज होत नसल्यामुळेच ती उघडण्यास टाळाटाळ केली जात असल्याचा दावा काही कंत्राटदारांनी केला आहे. मात्र, या आरोपांबाबत अधिकृतरीत्या कोणतीही पुष्टी झालेली नाही.
सुशिक्षित बेरोजगार कंत्राटदार कमी दरात काम करण्यास तयार असतानाही त्यांना संधी नाकारली जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी काही कंत्राटदारांनी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विनय ठमके यांची भेट घेऊन लेखी तक्रार साद केली आहे.
निविदा वेळेत न उघडल्यास आर्थिक अनियमिततेला वाव मिळण्याची शक्यता असल्याने या प्रकरणाची तातडीने चौकशी करावी, अशी मागणी कंत्राटदारांनी केली आहे.
प्रशासनाने येत्या दोन दिवसांत निविदा प्रक्रियेबाबत योग्य ती कार्यवाही करून ती पारदर्शकपणे पूर्ण न केल्यास गटविकास अधिकारी यांच्या दालनासमोर ठिय्या आंदोलन करण्यात येईल, असा इशारा कंत्राटदारांनी दिला आहे.
दरम्यान, तांडा वस्ती विकास योजनेतील ३३ लाख रुपयांच्या कामांची निविदा प्रक्रिया तातडीने पूर्ण करून सर्व इच्छुक कंत्राटदारांना समान संधी द्यावी, तसेच संपूर्ण प्रक्रिया पारदर्शकपणे पार पाडावी, अशी मागणी कंत्राटदारांसह नागरिकांमधून होत आहे.
---------------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी